दुबईत पूजा करणाऱ्या पंडिताला दिवसाला किती रुपये मिळतात? जबलपूरच्या पंडिताने केला मोठा खुलासा

दुबईच्या झगमगाटामागे संघर्षाची कहाणी! पंडित नीरज पंडित यांचा व्हिडिओ व्हायरल, कधी 12 हजार तर कधी 5 हजार रुपये कमाई. रात्रीच्या जेवणासाठी देखील करावा लागतोय संघर्ष.

दुबईत पूजा करणाऱ्या पंडिताला दिवसाला किती रुपये मिळतात? जबलपूरच्या पंडिताने केला मोठा खुलासा
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 22, 2026 | 5:22 PM

सध्या सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. अशातच आता दुबईमधील पंडित यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दुबई म्हटलं की डोळ्यांसमोर उंच इमारती, आलिशान गाड्या आणि श्रीमंतीचं जग उभं राहतं. मात्र, या झगमगाटामागे अनेक जण आपल्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत असतात. मध्य प्रदेशातील जबलपूरचे रहिवासी असलेले शास्त्री नीरज पंडित यांचा असाच एक अनुभव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. दुबईमध्ये पूजा-पाठ करून उदरनिर्वाह करणाऱ्या नीरज यांनी परदेशातील आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नीरज पंडित यांना त्यांच्या कमाईबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, दुबईमध्ये त्यांना कोणताही ठरलेला पगार मिळत नाही. किती कमाई होईल, हे मिळणाऱ्या कामावर अवलंबून असते. कधी एका पूजेसाठी 500 दिरहम म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 12,800 रुपये मिळतात, तर कधी केवळ 200 दिरहम म्हणजेच सुमारे 5,000 रुपयांवर समाधान मानावे लागते.

Loading...

सकाळच्या जेवणानंतर संध्याकाळच्या भाकरीची चिंता

दुबईत सुरुवातीचे दिवस आठवताना नीरज यांनी आपल्या कठीण परिस्थितीबद्दल सांगितले. ते म्हणाले की, नवीन देशात आल्यावर अनेकदा सकाळचे जेवण मिळाले तरी संध्याकाळी जेवणाची व्यवस्था कशी करायची, याची चिंता सतावत असे. परदेशात नव्याने आयुष्य सुरू करताना मूलभूत गरजा भागवण्यासाठीही त्यांना संघर्ष करावा लागला.

परदेशातही माणुसकी जपण्याचा संदेश

इतक्या अडचणींचा सामना करूनही नीरज यांच्या मनात कोणतीही कटुता नाही. दुबईसारख्या शहरात जगभरातील लोक राहतात. त्यामुळे सर्वांनी एकमेकांशी मिळून-मिसळून राहावे आणि विविध सण एकत्र साजरे करावेत, असे त्यांचे मत आहे. अशा वातावरणामुळे परदेशातही घरासारखे आपलेपण निर्माण होते असे ते सांगतात.

दरम्यान, दुबईच्या झगमगाटामागे लपलेला सामान्य माणसाचा संघर्ष नीरज पंडित यांच्या अनुभवातून समोर आला आहे. निश्चित उत्पन्न नसताना परदेशात स्वतःचे आयुष्य उभे करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते याची जाणीव त्यांच्या व्हायरल व्हिडिओमधून होते. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us