7 मिनिटांची जोरदार बोली अन् तब्बल इतक्या कोटींना विकली गेली राजा रवी वर्मा यांची पेटिंग; खरेदीदार कोण?
राजा रवी वर्मा यांच्या 'यशोदा आणि कृष्ण' या पेटिंगचा लिलाव नुकताच पार पडला. तब्बल 167 कोटी रुपयांना ही पेंटिंग विकली गेली. 1 एप्रिल रोजी मुंबईत हा लिलाव पार पडला. ही पेंटिंग कोणी खरेदी केली, ते जाणून घ्या..

भारतातील महान कलाकारांपैकी एक असलेल्या राजा रवी वर्मा यांची एक पेंटिंग तब्बल 167 कोटी रुपयांना विकली गेली आहे. एवढ्या मोठ्या किंमतीला ही पेंटिंग ‘कोविशिल्ड’ व्हॅक्सिन बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे मालक सायरस ए. पूनावाला यांनी खरेदी केली आहे. इतक्या मोठ्या किंमतीला लिलाव झालेली ही पेटिंग भारतातील सर्वांत महागड्या कलाकृतींपैकी एक ठरली आहे. या लिलावाने भारताच्या सर्वांत महागड्या पेटिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. 1890 च्या दशकात जेव्हा राजा रवी वर्मा हे प्रसिद्धीच्या शिखरावर होतो, तेव्हा त्यांनी ‘यशोदा आणि कृष्ण’ यांचं हे अत्यंत सुंदर चित्र रेखाटलं होतं. त्यांच्या याच पेंटिंगला सॅफ्रॉन आर्टच्या स्प्रिंग लाइव्ह लिलावात सायरस पूनावाला यांनी 167.20 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.
या पेंटिंगच्या लिलावाची प्रक्रिया 1 एप्रिल रोजी मुंबईत पार पडली. दिल्लीतल्या एका खाजगी संग्रहालयात राजा रवी वर्मा यांच्या कलाकृतीला खरेदी करण्यासाठी जवळपास सात मिनिटांपर्यंत अब्जाधीशांमध्ये जोरदार बोली लागली होती. अखेर त्यात सायरस पूनावाला यांनी बाजी मारली. राजा रवी वर्मा यांच्या या चित्रापूर्वी भारतीय कलेतील सर्वांत महागड्या कलाकृतीचा विक्रम एम. एफ. हुसैन यांच्या 1954 मधल्या ‘अनामिक (ग्राम यात्रा)’ या चित्राच्या नावावर होता. एम. एफ. हुसैन यांची ही पेंटिंग मार्च 2025 मध्ये क्रिस्टीच्या लिलावात 118 कोटी रुपयांना विकली गेली होती.
The world record for Indian art was broken with this Raja Ravi artwork which got sold for Rs 167.2 cr.
In a furious bidding war my friend Cyrus Poonawalla emerged victorious over the Czarina of Indian art Kiran Nadar! pic.twitter.com/tMrZEQRSKe— Harsh Goenka (@hvgoenka) April 2, 2026
दुप्पट किमतीला विकली पेंटिंग
राजा रवी वर्मा यांची ही पेंटिंग 80 ते 120 कोटी रुपयांना विकली जाण्याचा अंदाज होता, परंतु दुप्पट किंमतीला तिचा लिलाव झाला. ही खरेदी माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि कर्तव्याची बाब होती, अशी प्रतिक्रिया पूनावाला यांनी दिली. ते म्हणाले, “हा राष्ट्रीय वारसा वेळोवेळी सार्वजनिक पाहणीसाठी उपलब्ध करून दिला पाहिजे. हे शक्य करून दाखवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन.”
राजा रवी वर्मा यांच्या ‘यशोदा आणि कृष्ण’ या चित्रात माता यशोदा गायीचं दूध काढताना दिसत आहेत, तर बाळ कृष्ण हातातील दुधाचं भांडं पुढे करत आहे. हे चित्र भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग असून ते खरेदी करण्यासाठी अब्जाधीशांनी मोठी बोली लावली होती. राजा रवी वर्मा हे भारतातील महान कलाकारांपैकी एक होते. ते आजही सर्वश्रेष्ठ चित्रकारांमध्ये गणले जातात. 1848 मध्ये त्रावणकोरच्या किलिमानूर या प्रतिष्ठित घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. ते आधुनिक भारतीय कलेचे प्रणेते मानले जातात.