हा हा हा… तुकाराम मुंढेंमुळे बुड्ढीचे गुलाबी बाल झाले पांढरे, सगळं बदलून गेलं!

Tukaram Mundhe : ‘बुढ्ढी के बाल’ अर्थात कॉटन कँडीशी संबंधित एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे चर्चेत आले आहेत.

हा हा हा... तुकाराम मुंढेंमुळे बुड्ढीचे गुलाबी बाल झाले पांढरे, सगळं बदलून गेलं!
Tukaram Mundhe Cotton Candy Memes
Image Credit source: Google
| Updated on: Aug 18, 2026 | 10:27 PM

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे गेल्या काही काळापासून बनावट आणि भेसळयुक्त पदार्थांविरोधात कठोर कारवाई करत आहेत. आतापर्यंत मुंढे यांच्या टीमने अनेक ठिकाणी बनावट पदार्थांचा साठा जप्त केला आहे. तसेच काही पदार्थांवर बंदीही घातली आहे. अशातच आता तुकाराम मुंढे सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. ‘बुढ्ढी के बाल’ अर्थात कॉटन कँडीशी संबंधित एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या भीतीमुळे ‘बुढ्ढी के बाल’चा गुलाबी रंगच गायब झाला, असा मिश्कील दावा या व्हायरल फोटोसोबत केला जात आहे. यापूर्वी गुलाबी रंगात दिसणारे ‘बुढ्ढी के बाल’ आता पांढऱ्या रंगात दिसत असल्याचे या फोटोमध्ये दाखवण्यात आले आहे. यावर एकाने कमेंट करत म्हटले की आता खरंच बुढिया के बाल लग रहे हैं, पहले गुडिया के बाल लग रहे थे.

गुलाबी ‘बुढ्ढी के बाल’ अचानक पांढरे कसे?

‘बुढ्ढी के बाल’ तयार करताना आकर्षक गुलाबी रंगासाठी कृत्रिम रंगांचा वापर केला जात असल्याची चर्चा यापूर्वी अनेकदा झाली आहे. मात्र, बनावट आणि हानिकारक पदार्थांविरोधात प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारल्यानंतर कृत्रिम रंगाचा वापर टाळला जात असल्याने ‘बुढ्ढी के बाल’चा नैसर्गिक रंग पांढरा दिसू लागल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोच्या आधारे संबंधित विक्रेता कृत्रिम रंग वापरत होता किंवा आता रंगाचा वापर पूर्णपणे बंद झाला आहे, असा निष्कर्ष थेट काढता येत नाही. हा फोटो नेमका कुठला आहे आणि त्यामागील परिस्थिती काय आहे, याची माहिती समोर आलेली नाही.

मुंढेंच्या कारवाईची सोशल मीडियावर चर्चा

तुकाराम मुंढे यांनी बनावट, भेसळयुक्त आणि नियमबाह्य खाद्यपदार्थांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या कारवाईचा संदर्भ घेत नेटकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या भीतीमुळे बुढ्ढी के बाल पांढरे झाले अशा कमेंट केल्या आहेत.

बुढ्ढी के बालमध्ये कृत्रिम रंग?

बुढ्ढी के बाल म्हणजे कॉटन कँडीला आकर्षक रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही कृत्रिम रंगांबाबत आरोग्याच्या दृष्टीने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांमध्ये परवानगी नसलेल्या रंगांचा किंवा इतर हानिकारक घटकांचा वापर होत असल्यास संबंधित विक्रेत्यांवर प्रशासनाकडून कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियावरील हा फोटो सध्या विनोदाचा विषय ठरत असला, तरी खाद्यपदार्थांमध्ये अनधिकृत रंग आणि भेसळ टाळण्याचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us