सरकारी रूग्णालयाच्या आपत्कालीन विभागात थेट बैल घुसले, पुढे जे घडले ते..
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. थेट बैलांनी अशी काही करामत केली की, सर्वजण फक्त बघतच राहिले.

उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्हा रूग्णालयातून एक धक्कादायक व्हीडीओ समोर आला असून त्यामध्ये चक्क दोन बेवारस बैल आपत्कालीन विभागात घुसल्याचे दिसत आहे. हे बैल बघून दवाखाण्यात उपचारासाठी दाखल रूग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शिवाय अचानक घुसलेले दोन बैल पाहून जिल्हा रूग्णालयातील उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली. मात्र या सगळ्या घटनेवरून जिल्हा रूग्णालयातील रूग्णांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत. सरकारी रूग्णालये नागरिकांना चांगले उपचार घेण्यासाठी उभारण्यात आली असताना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार नसेल तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित रूग्णांच्या नातेवाईकांकडून विचारण्यात आलाय. बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतेही मोठे नुकसान अथवा जिवित हानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी दोन बेवारस बैल जेंव्हा महोबा जिल्हा रूग्णालयात घुसले तेंव्हा आपत्कालीन विभागाच्या दारावर रूग्णांच्या नातेवाईकांना दिसले. त्यांनी त्या बैलाना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातील एकाने सगळ्यांना हुलकावनी देत आत प्रवेश केला. अचानक ओढावलेला धक्कादायक प्रसंग पाहून रूग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली खरी पण त्या बैलाला बाहेर कोण काढणार हा प्रश्न निर्माण झाला. त्याचवेळी एक कर्मचारी समोर आला त्याने आपले धाडस दाखवत बेवारस बैलाला बाहेर काढले आणि पुढचा मोठा अनर्थ टळला.
अधिकाऱ्यांनी समोर येवून उत्तर देणं टाळलं
महोबा जिल्हा रूग्णालयात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर रूग्णालय प्रशासनाची बाजू घेण्याचा प्रयत्न झाला मात्र कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याकडून उत्तर देण्यात आलं नाही. मात्र या घटनेचा जो व्हीडीओ व्हायरल होतोय त्यावरून सोशल मिडीयावर मोठी चर्चा रंगलीय आणि सरकारी दवाखाण्यातील सुरक्षेवर प्रश्न विचारला जातोय.
रूग्णांच्या सुरक्षेची काळजी घ्या, नातेवाईकांची मागणी
जेंव्हा ही घटना घडली तेंव्हा एका रूग्णाचा नातेवाईक ब्रजराज सिंह याने हा सगळा प्रकार बघितला आणि त्यांनी सांगितलं की, आमच्या समोर दोन बैल आपत्कालीन विभागात घुसले तेंव्हा आम्हाला वाटले आता खूप मोठी हानी होणार पण सुदैवाने तसे काही घडले नाही. या घटनेवरून सरकारी रूग्णालयांनी बोध घेवून रूग्णांच्या सुरक्षेची कडेकोट काळजी घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.