आता थेट ATM मधूनच नवं कोरं कार्ड, बँकेच्या फेऱ्या थांबणार, ग्राहकांना मोठा दिलासा काय?
ATM Debit Card: डेबिट कार्डविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, आता डेबिट कार्ड घरी येण्याची वाट पाहावी लागणार नाही. ग्राहकांच्या बँकेच्या फेऱ्या आता थांबणार आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

ATM Debit Card: एटीएम केंद्र आता केवळ पैसे काढणे, चेक जमा करणे एवढ्यापुरते मर्यादीत नसेल. एटीएममधूनच नवं कोरं डेबिट कार्ड बाहेर येईल. त्यासाठी बँकेत हेलपाटे मारण्याची गरज नाही. अथवा टपालाने कार्ड घरी येण्याची आणि आठवडाभर वाट पाहण्याची गरज संपणार आहे. एटीएम मशीनचा नवीन डिजिटल अवतार आता लवकरच समोर येणार आहे. नवीन डेबिट कार्ड हे तात्काळ एटीएम मशीनधूनच प्रिंट होऊन हातात येईल. मुंबईत 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 आयोजित करण्यात आले. दुसऱ्या दिवशी वित्तीय सेवा विभागाच्या सचिवांनी या अत्यंत आधुनिक आणि क्रांतीकारी सुविधेचे अधिकृत अनावरण केले.
नेमकं कसं करणार ही व्यवस्था काम?
जागीच अर्ज आणि लागलीच हातात कार्ड
या नव्या सुविधेनुसार, ग्राहकाला कार्ड हरवल्यानंतर अथवा त्याची मुदत संपल्यानंतर, कार्ड एक्स्पायर झाल्यानंतर बँकेच्या शाखेत जाण्याची गरज उरणार नाही. ग्राहक बँकेच्या एटीएममध्ये जाऊन थेट अर्ज करतील आणि काही मिनिटातच त्या अर्जानुसार आणि त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे डेबिट कार्ड तयार होऊन बाहेर येईल.
लगेच प्रिंटिंग आणि ॲक्टिव्हेशन
एटीएममध्ये ग्राहकाची बायोमॅट्रिक आणि आधार पडताळणी होईल. सुरक्षित ओटीपी (OTP) प्रक्रियेद्वारे ग्राहकाची ओळख पटवली जाईल. एटीएम मशीन काही मिनिटांतच नवं कोरं डेबिट कार्ड जनरेट होऊन बाहेर येईल. त्यावर ग्राहकाची माहिती आणि मुदत आणि इतर माहिती असेल.
ग्राहकांना मोठा दिलासा
1. वेळेची मोठी बचत: बँकेकडे ऑनलाईन, बँक व्हॉटसॲप द्वारे विनंती केल्यावर टपालाने डेबिट कार्ड घरी येण्यासाठी 4 ते 7 दिवसांचा कालावधी लागतो. आता हा कालावधी काही मिनिटांवर येईल.
2. बँकेच्या शाखेवरील ताण कमी: दैनंदिन कामांसाठी अगोदरच बँकेत मोठी गर्दी असते. कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असतो. त्यात डेबिट कार्डसंबंधीच्या माहितीसाठीही अनेक ग्राहक येतात. आता नवीन व्यवस्थेमुळे हा भार हलका होईल.
3. गरजेच्या वेळी लागलीच मदत: अचानक प्रवासात डेबिट कार्ड हरवते, ते चोरीला जाऊ शकते. अशावेळी कार्ड ब्लॉक केल्या जाते. पण नवीन कार्ड येण्यासाठी बरीच वाट पाहावी लागते. आता ही झंझट संपेल. कार्ड ब्लॉक केल्यावर अवघ्या काही मिनिटात ग्राहकांना नवीन डेबिट कार्ड मिळेल.
या सुविधेसाठी किती रुपये शुल्क आकारले जाईल. कार्डवरील नाव चुकल्यास लागलीच दुसरे कार्ड तयार करता येईल का? डेबिट कार्ड वर्षातून किती वेळा तयार करता येईल याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण हे एक क्रांतिकारक पाऊल मानल्या जात आहे.