मोदी-शाहांचा महाराष्ट्रात तळ, मात्र ना सोनिया फिरकल्या, ना प्रियांका!

| Updated on: Oct 18, 2019 | 10:33 AM

एकीकडे भाजप-शिवसेनेला त्यांची सत्ता टिकवून ठेवायची आहे, तर दुसरीकडे आघाडीसाठी ही निवडणूक त्यांचं राजकारणातील भविष्य ठरवणारी आहे. मात्र, असं असलं, तरी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापासून दूरच आहेत.

मोदी-शाहांचा महाराष्ट्रात तळ, मात्र ना सोनिया फिरकल्या, ना प्रियांका!
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे (Maharashtra Assembly Elections). एकीकडे भाजप-शिवसेनेला त्यांची सत्ता टिकवून ठेवायची आहे, तर दुसरीकडे आघाडीसाठी ही निवडणूक त्यांचं राजकारणातील भविष्य ठरवणारी आहे. मात्र, असं असलं तरी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापासून दूरच आहेत (Sonia Gandhi). त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकांकडे सोनिया गांधींनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये येत्या 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर 19 ऑक्टोबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. शनिवारी 19 ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. तरीही काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी  (Sonia Gandhi Rally) यांनी अजूनही महाराष्ट्रात एकही सभा घेतलेली नाही. इतकंच नाही, तर प्रियांका गांधी यांनीही महाराष्ट्रातील प्रचाराकडे पाठ फिरवली आहे.

प्रदेश काँग्रेसची मागणी अमान्य

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याकडे राज्यात प्रचार सभा आणि रोड शोची मागणीही केली. मात्र, अद्याप ही मागणी अमान्य आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या प्रचाराची सर्व जबाबदारी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात (Maharashtra Congress) यांच्यावर येऊन ठेपली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची समजली जाते. त्यामुळेच भाजपचे अनेक दिग्गज नेते या निवडणुकीत जातीने लक्ष देत आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभा घेतल्या, गृहमंत्री अमित शाह यांनीही अनेक ठिकाणी सभा घेतल्या. मात्र, काँग्रेसचे बडे नेते या निवडणुकीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

काँग्रेसचे दिग्गज अद्यापही प्रचारापासून दूर

लोकसभेत पराभव झाल्यानंतर विधानसभेत आपली पकड मजबूत करण्याची काँग्रेसकडे संधी होती. मात्र, दोन राज्यांमध्ये इतक्या महत्त्वाच्या लढती असूनही काँग्रेसचे दिग्गज अजूनही प्रचाराच्या मैदानात उतरलेले नाहीत.

राहुल गांधी हे देखील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापासून दूर राहिले होते. पण, ऐन निवडणुकीत परदेशात गेल्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात दोन प्रचार सभा घेतल्या.

महायुतीची आज संयुक्त सभा

महायुतीतील सेना-भाजपा हे विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी अनेक सभा घेत फिरत आहेत. महायुतीची आज (18 ऑक्टोबरला) एकत्रित सभाही आहे. मात्र, आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख पक्षाची अद्यापही विधानसभा निवडणुकीसाठी एकही संयुक्त प्रचारसभा झालेली नाही. शरद पवार आणि सोनिया गांधी यांचीही एकत्रित सभा नाही. त्यामुळे काँग्रेसचे दिग्गज महाराष्ट्रातील निवडणुकांकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे.

सोनिया गांधींची हरियाणातील सभा रद्द

महाराष्ट्रासोबतच हरियाणातही विधानसभा निवडणूक आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह ते हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर भाजपासाठी जोरात प्रचार करत आहेत. तर राहुल गांधी यांनीही हरियाणात एक सभा घेतली. सोनिया गांधी या देखील हरियाणात प्रचार करणार असल्याची माहिती होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीमुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे. सोनिया गांधी यांची हरियाणामधील महेंद्रगड येथे रॅली होणार होती. मात्र, आता राहुल गांधी या रॅलीला संबोधित करणार आहेत. शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज शुक्रवारी (18 ऑक्टोबर) ही सभा होणार आहेत.