
Iran Milk Meat Bread Rates Hike: इराणविरोधात इस्त्रायल आणि अमेरिकेने मोर्चा उघडला. तर इराण सुद्धा चोख प्रत्युत्तर देत आहे. पण युद्धाचे ढग गडद झाल्यापासून इराणमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. गेल्या 10 वर्षात सर्वच अन्नपदार्थांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामध्ये जवळपास 30 पट वाढ झाली आहे. 2016 मध्ये साप्ताहिक फूड बास्केटची किंमत 1.2 दशलक्ष रियाल होती. ती 2026 पर्यंत ती वाढून 36.6 दशलक्ष रियालवर पोहचली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून इराणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वस्तूंचा साठा करायला सुरुवात केल्याने महागाईत तेल ओतल्या गेले आहे.
10 वर्षात किंमतीत मोठी उसळी
बीबीसीच्या एका वृत्तानुसार, 2016 ते 2026 या दरम्यान फूड बॉस्केटच्या किंमतीत जवळपास 30 पटपर्यंत वाढ झाली. अवघ्या दहा वर्षांतील ही महागाई, तिथली दाहकता दर्शवते. 10 वर्षांपूर्वी ज्या वस्तू स्वस्तात मिळत होत्या. त्या आता अचानक महाग झाल्या आहेत. त्यासाठी नागरिकांना लाखो रियाल खर्च करावे लागत आहेत. याचा सर्वात मोठा फटका मध्यम आणि गरीब उत्पन्न गटाला मोठा फटका बसला आहे. त्यांना दैनंदिन घर खर्च चालवणे अवघड झाले आहे. दोन वेळच्या जेवणाची त्यांची भ्रांत आहे.
2021 नंतर महागाईत मोठी वाढ
2016 ते 2020 या दरम्यान किंमतीत इतकी मोठी वाढ झाली नव्हती. पण 2021 नंतर महागाई झपाट्याने वाढली. 2023 मध्ये फूड बास्केटसाठी 10.9 दशलक्ष रियाल खर्च आला. 2016 च्या तुलनेत जवळपास 9 पट्टीने हा भाव अधिक होता. बाजारात वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आणि अस्थिरता वाढू लागली. परिणामी किंमती वाढल्या.
1 किलो मटण — जवळपास 13–22 दशलक्ष रियाल
1 लिटर दूध — जवळपास 520,000 → 1.1 दशलक्ष रियालपर्यंत
1 बॉक्स पास्ता — जवळपास 340,000 → 570,000 रियालपर्यंत
एक ब्रेड पॅकेट ~50,000 इराणी रियालपर्यंत
2025 ते 2026 दरम्यान मोठा झटका
महागाईचा आगडोंब 2025 ते 2026 या दरम्यान नोंदवण्यात आला. या काळात किंमती 19.3 दशलक्ष रियालमधून वाढून 36.6 दशलक्ष रियाल इतक्या वाढल्या. म्हणजे एका वर्षात जवळपास दुप्पट वाढ झाली. 2026 मध्ये वार्षिक दरवाढ जवळपास 90 टक्क्यांपर्यंत वाढला. सध्या या देशात महागाईचा कहर पाहायला मिळत आहे. परिणामी सर्वसामान्य इराणी नागरीक हैराण झाला आहे.