इंधन दरवाढीनंतर आता ‘टोलधाड’; सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक भार!

| Updated on: Mar 28, 2022 | 5:30 AM

प्रत्येक 60 किलोमीटर अंतरावर एक टोलनाका असणार आहे, असं वक्तव्य नुकतंच केंद्रीय वाहतूक आणि रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलंय. तसेच टोलनाक्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना आधारकार्डाच्या आधारे टोलपास जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही.

इंधन दरवाढीनंतर आता टोलधाड; सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक भार!
Follow us on

चकचकीत हायवे पाहून तुम्ही 100 च्या वेगानं कार चालवता. मात्र, सरकारही (Government) काही कमी नाही, सरकारही फुल स्पीडमध्येच तुमचा खिसा रिकामा करतंय. तुम्ही विचार कराल सरकारनं आधीच इंधन दरवाढ (Fuel price hike) करून आमचा खिसा कापलाय. आता आमच्या खिशात आहे तरी काय ? आता तुमचा खिसा टोल नाक्यावर कापला जाणार आहे. कारण प्रत्येक 60 किलोमीटर अंतरावर एक टोलनाका असणार आहे, असं वक्तव्य नुकतंच केंद्रीय वाहतूक आणि रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलंय. तसेच टोलनाक्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना आधारकार्डाच्या आधारे टोलपास जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही. 60 किलोमीटर अंतरापेक्षा कमी अंतरावर असणारे टोलनाके येत्या तीन महिन्यात हटवले जाणार आहेत, असंही गडकरींनी म्हटलंय. गडकरींच्या या वक्तव्यामुळे भविष्यात सरकार प्रत्येक 60 किलोमीटर अंतरावर एक टोलनाका उभारणार का ? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय.

एनएचआयचा बोलण्यास नकार

हाच प्रश्न जेंव्हा आम्ही एनएचआयच्या प्रवक्त्यांना विचारला तर तेंव्हा त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. त्यामागे एक कारण आहे, सरकारला अमेरिकेप्रमाणे गुळगुळीत हायवे तयार करावयाचे आहेत. मोठ्या प्रमाणात एक्सप्रेसवे आणि हायवे बांधण्यातही येत आहेत. रस्ते बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येतीये. ही गुंतवणूक येणार कुठून ? तर सरकार नवे टोलनाके उभारून गुंतवणूक केलेली रक्कम वसूल करणार आहे. याचं दुसरं कारण NHAI ची बिघडलेली आर्थिक परिस्थिती हे सुद्धा आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे. NHAI वर एकूण 3.17 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. कर्ज चुकवण्यासाठी NHAI ला दरवर्षी 32 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

देशभरात 727 टोलनाके

देशात सध्या 1 लाख 40 हजार 152 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग आहेत. या महामार्गावर 727 टोलनाके आहेत. तर सरासरी 192 किलोमीटर अंतरावर एक टोलनाका आहे. आता टोलनाक्याचे गणितही उदाहरणाद्वारे समजून घेऊयात दिल्ली ते हरिव्दार हे अंतर 212 किलोमीटर आहे. हे अंतर पूर्ण करण्यासाठी 5 तास लागतात आणि त्यासाठी 275 रुपये टोल द्यावा लागतो. तर दिल्ली ते लखनऊ या 528 किलोमीटर प्रवासासाठी 1050 रु. टोल द्यावा लागतो. देशातील विविध भागात अशाच प्रकारे कमी अधिक प्रमाणात टोल द्यावा लागतो. याचाच अर्थ सध्या सरासरी एका किलोमीटर प्रवासासाठी दीड ते दोन रुपये टोल द्यावा लागत आहे.

दररोज 119 कोटी रुपयांचं उत्पन्न

आता NHAI च्या कमाईचं गणित पाहूयात डिसेंबर 2021 मध्ये NHAI नं टोलमधून तीन हजार 679 कोटी रुपयांची कमाई केलीये. म्हणजेच दररोज 119 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलंय. 2022-23 मध्ये NHAI च्या प्रत्येक पाच रुपयांच्या खर्चातील एक रुपया हा कर्ज परतफेडीसाठी खर्च होणार आहे. 2022-23 या वर्षात NHAI ला कर्ज चुकवण्यासाठी 31,049 कोटी रुपये आणि 2023-24 मध्ये 31,735 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालात देण्यात आलीये. रस्ते, पूल, भुयारी मार्गाचा वापर केल्यानंतर प्रवाशांना टोल द्यावा लागतो. अशा रस्त्यांना टोल रस्ते असे म्हणतात. टोल कर हा एक अप्रत्यक्ष कर आहे. रस्त्यांच्या देखभालीसाठी टोलची वसुली करण्यात येते. रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वसूल झाल्यानंतर टोलचे दर 40 टक्क्यानं कमी होतात, या टोलच्या रक्कमेचा वापर रस्त्यांचा देखभालीसाठी करण्यात येतो. इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आलाय. आता गडकरींच्या वक्तव्यानंतर प्रत्येक 60 किलोमीटर अंतरावर टोल वसुलीचं संकट गडद होतेय.

संबंधित बातम्या

…तर पुढील आठ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार; निती आयोगाचा अंदाज

पुढील आठवडा शेअर मार्केटसाठी कसा राहणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

सोमवार, मंगळवारी बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; बँकिंग सेवेवर परिणाम, सलग सुट्यांमुळे ग्राहकांचे हाल