लग्नासाठी पैशांची गरज पडली का? पीएफमधून किती पैसे काढू शकता? जाणून घ्या नियम
घर बांधताना आणि लग्नावेळी किती पैसा लागतो हे ज्याने अनुभवलं आहे त्यालाच माहिती काय असतं. अनेक जण लग्नात पैशांची गरज भासली तर पीएफमधून पैसा काढण्यासाठी धाव घेतात. पण पीएफमधून पैसे काढण्यासाठी काही नियम आहेत. चला जाणून घेऊयात त्याबाबत

जून जुलै महिन्यात अनेकांची लग्न जमतात आणि डिसेंबरपर्यंत लग्नाची तारीख सुटते. अशा स्थितीत पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू होते. कारण लग्नात पैसा पाण्यासारखा खर्च होतो. कोणतीच उणीव भासू नये यासाठी मागे पुढे पाहिलं जात नाही. अनेकदा लग्न ओव्हर बजेट झालं तर पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी धाव घेतात. जर तुम्हाला लग्नासाठी किंवा घरातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नासाठी पैशांची गरज असेल तर पीएफ खात्यातून काढू शकता. चला जाणून घेऊयात पीएफ खात्यातून किती पैसे आणि कसे काढू शकते ते…
लग्नासाठी पैसे काढण्यासाठी नियम
ईपीएफओच्या नियमानुसार, कर्मचारी स्वत:च्या लग्नासाठी, मुला मुलीच्या लग्नासाठी किंवा भावाबहिणीच्या लग्नासाठी पीएफ खात्यातून काही ठराविक रक्कम काढू शकतो. पण यासाठी नियम आखून दिलेले आहेत. त्या नियमांतर्गत पैसे काढता येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्याची ईपीएफ सदस्यता कमीत कमी सात वर्षे जुनी असणं गरजेचं आहे. जर तुम्ही पीएफमध्ये सात वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ योगदान दिलं असेल तर तुम्ही खात्यातून पैसे काढण्यास पात्र ठरता.
किती रक्कम काढता येते?
लग्नासाठी पीएफ खात्यातून कर्मचारी योगदान आणि त्यावर मिळलेल्या व्याजातून अधिकांश 50 टक्के रक्कम काढू शकतो. उदाहरणत: कर्मचाऱ्याचं योगदान आणि त्यावरील व्याजाची रक्कम पाहता एकूण 8 लाख रुपये आहेत. तर तुम्ही जास्तीत जास्त 4 लाख रुपये काढू शकता. एक लक्षात ठेवा की ही रक्कम फक्त कर्मचाऱ्याचं योगदान आणि व्याजाच्या रकमेवर असेल. म्हणजेच कंपनीचं असलेल्या योगदातून तुम्हाला रक्कम काढता येत नाही. ईपीएफओ लग्न किंवा शिक्षणासाठी खात्यातून जास्तीत जास्त तीन वेळा रक्कम काढण्याची परवानगी देते.
ऑनलाईन कसा अर्ज कराल?
ईपीएफओची प्रक्रिया ऑनलाईन आहे. तु्म्हाला ईपीएफोच्या युनिफाइड मेंबर पोर्टलवर लॉगिन करून फॉर्म 31 भरून एडवान्स रक्कम काढण्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी आधार, पॅन आणि बँक खातं पीएफशी लिंक असणं गरजेचं आहे. अर्ज स्वीकारल्यानंतर रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते. खरं सांगायचं तर पर्सनल लोनपेक्षा पीएफ एडवान्स हा चांगला पर्याय ठरतो. कारण खात्यात जमा असलेली रक्कम आपलीच असते आणि त्यावर कोणतंही व्याज भरावं लागत नाही.