कॉलेजची असाइनमेंट जमा करता आली नाही, तिथूनच सुचली जिओची कल्पना ! ईशा अंबानींनी सांगितला रंजक किस्सा
कॉलेजमध्ये असाईनमेंट सबमिट न करता आल्याने त्रस्त असतानाच, त्यातूनच जिओची आयडिया सुचल्याचं ईशा अंबानीने सांगितलं. आकाश अंबानीशी झालेल्या चर्चेनंतर भारतात स्वस्त आणि उत्तम इमटरनेट उपलब्ध करून

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची कन्या, ईशा अंबानी हिने जिओची सुरूवात कशी झाली, त्याचा एक रंजक किस्सा सांगितला. कॉलेजमध्ये असताना, एक असाईनमेंट ऑनलाइन सबमिट न करता आल्याने ती त्रस्त झाली. आणि याच अडचणीमुळे भारतामधील इंटरनेट कनेक्टिव्हिटीबाबत महत्वाची चर्चा सुरू झाली. याच चर्चेतून पुढे रिलायन्स जिओच्या कल्पनेचा पाया घातला गेलाय. त्यातूनच जिओची कहाणी पुढे सुरू झाली.
एका असाइनमेंटमधून कशी सुरू झाली जिओची कहाणी?
याबाबत बोलताना ईशा अंबानी हिने सांगितलं की 2009-10 साली ती आणि तिचा भाऊ आकाश अंबानी हे दोघे अमेरिकेतील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. सुट्टीसाठी ते दोघे मुंबईत आले, त्याचवेळी इशाला तिच्या कॉलेजची असाइनमेंट ऑनलाइन सबमिट करायची होती; मात्र घरातील इंटरनेट काम करत नसल्यामुळे तिला ती असाइनमेंट जमा करताच आली नाही
मात्र आलेली ही ही छोटीशी अडचणच, पुढे एका मोठ्या व्यावसायिक कल्पनेचे कारण ठरली. भारतातील इंटरनेटची सुविधा, ही अमेरिकेच्या तुलनेत इतकी कमकुवत का आहे आणि देशातील लोकांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी कशी उपलब्ध करून देता येईल, यावर ईशा आणि आकाश यांनी चर्चा केली.
धीरूभाई अंबानी यांच्या आठवणींना दिला उजाळा
यावेळी ईशा अंबानीने तिचे आजोबा, धीरूभाई अंबानी यांच्या आठवणींना उजाळा दिला. 1977 साली माझे आजोबा धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला शेअर बाजारात सूचिबद्ध केले. गेल्या जवळपास ५० वर्षांत रिलायन्सने वार्षिक सरासरी २९ टक्के परतावा दिला आहे. आज मी माझ्या आजोबांचे प्रेमाने आणि कृतज्ञतेने स्मरण करते, असं त्यांनी नमूद केलं.
त्यांच्यासाठी रिलायन्स ही केवळ एक कंपनी नव्हती, तर प्रत्येक भारतीयाला देशाच्या विकासात सहभागी होण्याची, समृद्धीचा वाटेकरी होण्याची आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी देणारी एक चळवळ होती. अधिक सामर्थ्यशाली, आत्मविश्वासपूर्ण आणि समृद्ध भारताचे स्वप्न त्यांनी लाखो भारतीयांच्या मनात रुजवले. मोठी स्वप्ने पाहा, निर्भयपणे पुढे चला, व्यापक विचार करा आणि सातत्यपूर्ण नवनिर्मितीतून उत्कृष्टतेचा ध्यास घ्या, हा त्यांचा संदेश आजही आम्हाला प्रेरणा देतो.
आज तीन पिढ्यांनंतरही आकाश, अनंत आणि मी “GROWTH IS LIFE — विकास हेच जीवन!” या मूलमंत्राशी कटिबद्ध आहोत. आजोबांची दूरदृष्टी आणि त्यांचे स्वप्न पुढे नेत असताना, त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि रिलायन्सच्या प्रवासात सहभागी झालेल्या लाखो भागधारकांचा विश्वास जपणे, हीच आमची जबाबदारी आणि प्रेरणा आहे, असं त्यांनी म्हटलं.
भारतातील इंटरनेटची समस्या ठरली चर्चेचा विषय
त्या काळात भारतात इंटरनेटचा वेग आणि उपलब्धता हे मोठी आव्हान होतं. इंटरनेट वापरण्यासाठी लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागत होते. तेव्हा तर मोबाईल डेटाही आजच्यासारखा सहज आणि कमी किमतीत उपलब्ध नव्हता. मात्र येत्या काळात इंटरनेट हे काही केवळ संवाद साधण्याचं माध्यम राहणार नाही, तर भविष्यात शिक्षण, व्यवसाय, मनोरंजन आणि दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनेल, हे ईशा आणि आकाश यांच्या लक्षात आलं. त्यामुळे भारतातील लोकांनाही स्वस्त आणि उत्तम इंटरनेट मिळणे आवश्यक होते. या चर्चेमुळे रिलायन्स समूहामध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या शक्यतांचा विचार करण्याचा मार्ग खुला झाला.
2016 साली सुरू झाली जिओची सेवा
अखेर रिलायन्स जिओने सप्टेंबर 2016 साली त्यांची दूरसंचार सेवा सुरू केली. सुरुवातीला कंपनीने मोफत व्हॉइस कॉलिंग आणि कमी किमतीत डेटा उपलब्ध करून दिला आणि बाजारपेठेत मोठा बदल घडवून आणला. त्यामुळे मोबाईल इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आणि इतर दूरसंचार कंपन्यांवरही त्यांची सेवा व दरांमध्ये बदल करण्याचा दबाव निर्माण झाला. जिओच्या आगमनानंतर ऑनलाइन व्हिडिओ पाहणं, डिजिटल पेमेंट, सोशल मीडियाचा वापर आणि इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षण घेण, अशा अनेक गोष्टी पूर्वीच्या तुलनेत अधिक लोकांसाठी सोप्या झाल्या.
आता जिओ प्लॅटफॉर्मसच्या आयपीओची तयारी
आता जिओ प्लॅटफॉर्म्स आपल्या IPO ची तयारी करत असतानाच ईशा अंबानी यांनी हा किस्सा सांगितला आहे. कंपनीने ने 30,213 कोटी रुपयांपर्यंत निधि उभारण्याच्या योजनेसह रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) दाखल केलं आहे.
दैनंदिन जीवनातील एखादी छोटीशी अडचणही मोठ्या व्यावसायिक संकल्पनेला जन्म देऊ शकते, हेच जिओचा प्रवास दाखवून देतो. भारतात स्वस्त आणि दर्जेदार इंटरनेट उपलब्ध करून देण्याच्या विचारातून सुरू झालेली चर्चा पुढे देशाच्या दूरसंचार क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारी ठरली. जिओच्या या यशस्वी प्रवासात मोठी गुंतवणूक, आधुनिक तंत्रज्ञान आणि दूरदृष्टीपूर्ण व्यावसायिक धोरण यांचाही मोलाचा वाटा आहे.
अनेक दशकांचा विचार करून रिलायन्सची वाटचाल
भारताने इंटरनेटच्या बाबतीत मागे का राहावे, हा रिलायन्स जिओच्या संकल्पनेमागे मूलभूत प्रश्न होता, असं ईशा अंबानी हिने सांगितलं. रिलायन्सचे नियोजन केवळ आज किंवा उद्या म्हणजेच – वर्तमानाचा किंवा नजीकच्या भविष्याचा विचार करून केलं जात नाही, तर पुढील अनेक दशकांतील गरजा लक्षात घेऊन कंपनी आपल्या व्यवसायाची दिशा ठरवते असं ती म्हणाली. आर्थिक शिस्त आणि दीर्घकालीन नियोजन हे रिलायन्सच्या कार्यपद्धतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. व्यवसाय उभारणे, त्यात गुंतवणूक करणे, उत्पन्न निर्माण करणे आणि मिळालेला निधी पुन्हा व्यवसायाच्या विस्तारासाठी गुंतवणे, या तत्त्वांवर कंपनीची वाटचाल सुरू आहे.
ईशा यांच्या मते, प्रत्येक भारतीयाला भारताच्या यशोगाथेचा भाग बनवणे हे रिलायन्सचे उद्दिष्ट आहे. तर जिओचा मंत्र आहे — स्वप्ने पाहण्याचे धाडस करा, मोठा विचार करा आणि उत्कृष्टता मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहा.