Petrol-Diesel Price Hike: केवळ पेट्रोल-डिझेलच नाही… औषधं, खाद्य पदार्थ… यादी पाहून व्हाल हैराण… महागाई सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार
Petrol- Diesel Price Hike impact on Inflation: एकदा, दोनदा नाही तर 10 दिवसात चौथ्यांदा देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या. त्याचा परिणाम सर्वच वस्तूंच्या महागाईवर झाला आहे. देशात महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे.

Essentials Items Costlier: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वारेमाप उधळल्या आहेत. गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. इंधनाच्या किंमती 7 रुपये प्रति लिटरने महागली आहे. सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. वाहतूक महागल्याने सर्वच वस्तूच्या किंमतीत वाढ होण्याची भीती आहे. खाद्यपदार्थ, किराणा सामान, खाद्यतेल, औषधं, प्रवास सर्वच महागणार आहे. सर्वसामान्यांवर महागाई बॉम्ब पडणार आहे.
10 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महाग
देशात तेल कंपन्यांनी 15 मे रोजी चार वर्षांनतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ केली. इंधन प्रति लिटर 3 रुपयांनी महागले. त्यानंतर 19 मे रोजी 90 पैशांनी, 23 मे रोजी 97 पैशांनी किंमती वधारल्या. तर चौथ्यांदा 25 मे रोजी पेट्रोल 2.61 रुपये प्रति लिटर, तर डिझले 2.71 रुपये प्रति लिटरने महागले. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये तर डिझेल प्रति लिटर 95.20 रुपये असा भाव आहे.
काय काय होणार महाग?
डिझेल महागल्याने अनेक वस्तू आणि सेवा महागतील. देशातील दळणवळण आणि वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम होईल. दैनंदिन वस्तूवर त्याचा मोठा परिणाम होईल. भाजीपाला, फळ, दूध, डेअरी उत्पादन, औषधं, एफएमसीजी वस्तू महागतील. याशिवाय वाहतूक महागल्याने उत्पादन साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स, ई-कॉर्मस डिलिव्हरी महाग होईल. त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होईल. हे साहित्य देशात एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी मालवाहतुकीचा वापर होतो. डिझेल महागल्याने वाहतूक खर्च वाढेल आणि त्याचा परिणाम वस्तूंच्या किंमतींवर दिसेल.
रुपयांची घसरण आणि आता पेट्रोल-डिझेल रडवणार
डॉलरच्या तुलनेत रुपयांची सततची घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा झटका मानली जात आहे. त्यामुळे इतर देशातून ज्या वस्तू आयात करण्यात येतात, त्यावर थेट परिणाम होत आहे. आयातीसाठी अधिकचा रुपया मोजावा लागत आहे. कारण परदेशातून आयात होणार्या वस्तूंसाठी डॉलरमध्येच पेमेंट करण्यात येते. रुपया दिवसागणिक धाराशायी होत असल्याने जास्त डॉलर खर्ची पडत आहेत. तर आता पेट्रोल आणि डिझेलचा भाव सातत्याने वाढत असल्याने महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे.