Petrol-Diesel Price: डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन्… पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
Donald Trump Tariff Decision: डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे भारताला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती ऐन सणासुदीत कमी होण्याची शक्यता बळावली आहे. बाजारातील महागाईची सूज कमी होणार का?

Petrol And Diesel Price: रशियाकडून कच्चा तेलाची खरेदी करणाऱ्या देशांवर, भारत आणि चीनवर अमेरिकेने 100 टक्के आयात शुल्क (Tariff) लादले होते. पण आता या निर्णयावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी पलटी मारली आहे. त्यांनी हा मोठा निर्णय मागे घेतला आहे. हा निर्णय पुढे ढकलल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. रशियाशी संबंधित प्रतिबंधांनाही स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे भारतासह इतर प्रमुख तेल आयात करणाऱ्या देशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी कंपन्यांचा तोटा कमी होण्यास मदत होईल. तर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नेमका वाद काय?
या वादाला युक्रेन-रशियाच्या युद्धाची झालर आहे. रशियाला इंधन खरेदीमुळे मोठी रसद मिळत आहे आणि त्याच बळावर गेल्या चार वर्षांहून अधिक काळ हे युद्ध सुरू असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे होते. त्यामुळे भारतासह चीन आणि इतर राष्ट्रांनी तातडीने इंधन खरेदी थांबण्याची आग्रही मागणी ट्रम्प यांनी केली होती. या सर्वच देशांनी रशियासोबतची इंधन खरेदी थांबवली नाही, त्या रागातून ट्रम्प प्रशासनाने पाच देशांवर 100 टक्के दंड लावण्याची घोषणा केली. यामुळे भारताच्या निर्यातीसह आयातीवर मोठा आर्थिक तणाव येणार होता. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताचा विचार करत त्यांना मिळालेल्या विशेष अधिकाराचा वापर करत टॅरिफ लादण्याचा प्रस्ताव तुर्तास स्थगित केला.
पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार?
अमेरिकेने 100 टक्के दंड लादण्याचा निर्णय पुढे ढकल्यामुळे रशियासोबतची इंधन खरेदी सुरळीत होईल. भारत अगोदरपासूनच सवलतीच्या दरात रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत होता. या दिलासादायक बातमीमुळे सरकारी तेल कंपन्यांचा कच्चा तेलाचा खर्च नियंत्रणात राहण्यात मदत होईल. जागतिक बाजारात या निर्णयाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आखातातील युद्ध थांबल्यास कच्चा तेलाचे भाव कोसळतील आणि पर्यायाने देशातंर्गत पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी होण्याची शक्यता आहे. भारतावर आलेले संकट टळले आहेत. त्यात भारत आणि अमेरिका व्यापारी करार जर फलद्रुप झाला तर कदाचित चित्र अजून सकारात्मक दिसेल. देशात इंधन स्वस्त होण्यास मदत होऊ शकते.