फेअर प्ले गैरव्यवहारात बॉलीवूड कलाकार ? महादेव ॲपशी संबंध, अभिनेत्यांची ‘ईडी’ चौकशी होणार

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आलेले फेअर प्ले ॲप हे सट्टेबाजीमुळे चर्चेत आलेल्या महादेव ॲपशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे. 'फेअर प्ले'च्या प्रमोशनसाठी बॉलीवूडमधील प्रमुख कलाकारांनी काम केल्याची माहिती 'ईडी'च्या हाती लागली आहे.

फेअर प्ले गैरव्यवहारात बॉलीवूड कलाकार ? महादेव ॲपशी संबंध, अभिनेत्यांची ईडी चौकशी होणार
| Updated on: Jun 15, 2024 | 8:52 AM

लोकसभा निवडणूक आणि आयपीएल सामन्यांत सट्टा लावल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आलेले फेअर प्ले ॲप हे सट्टेबाजीमुळे चर्चेत आलेल्या महादेव ॲपशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘फेअर प्ले’च्या प्रमोशनसाठी बॉलीवूडमधील प्रमुख कलाकारांनी काम केल्याची माहिती ‘ईडी’च्या हाती लागली आहे. त्यामुळे आगामी काळात बॉलीवूडमधील काही कलाकारांना चौकशीसाठी समन्स जारी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. ‘फेअर प्ले’शी निगडित 19 ठिकाणांवर ‘ईडी’ने बुधवारी छापेमारी केली होती.

महादेव बेटिंग ॲपची उपकंपनी असलेल्या ‘फेअर प्ले’ प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीचा एक भाग म्हणून मुंबईस्थित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी शोधमोहीम राबवली. ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी फेअरप्ले या सट्टेबाजी ॲपच्या जाहिरात आणि समर्थनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींना साइन करण्यात गुंतलेली होती. म्हणजेच या कंपन्यांच्या माध्यमातून फेअर प्ले कंपनीने बॉलीवूडमधील कलाकारांना आपल्या वेबसाइटच्या प्रमोशनसाठी वापरले होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच, त्यांचे मानधन या कंपन्यांना दिले होते. या कंपन्यांच्या माध्यमातून या कलाकारांना मानधन देण्यात आले होते.

‘फेअर प्ले’द्वारे केवळ सट्टेबाजीच झाली नव्हती, तर आयपीएल सामन्यांचे प्रसारणदेखील झाले होते. याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री तमन्ना भाटिया, रॅपर बादशाह यांना चौकशीसाठी समन्स जारी केल्याची माहिती देखील समोर आली आहे.

‘फेअर प्ले’वरून होत असलेल्या प्रसारणाचे प्रमोशनदेखील बॉलीवूडमधील कलाकारांनी केले होते. आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क ज्या व्हायकॉम १८ कंपनीकडे आहेत त्यांनी याप्रकरणी पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ‘ईडी’ने याचा तपास सुरू केला आहे