रात्री नूडल्स खाऊन झोपले, ते उठलेच नाही… एकाच घरात सापडल्या 5 जणांच्या डेडबॉड्या; शहरात थरकाप
ग्रेटर नोएडा येथे एकाच घरात कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पती, पत्नी आणि तीन मुलांचा यात समावेश आहे. रात्री नूडल्स खाल्ल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. विषबाधेची शक्यता वर्तवली जात असून पोलीस आणि फॉरेन्सिक टीम कसून तपास करत आहे.

Greater Noida Crime News : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील रबूपुरा पोलीस ठाणे क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे अख्ख्या शहरातील नागरिकांचा थरकाप उडाला आहे. एका घरात त्या कुटुंबातील पाच लोकांचे मृतदेह आढळून आल्याने सर्वच हादरले आहेत. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या तीन निरागस बालकांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी धाव घेतली. हे घर सील करण्यात आलं असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अन्नातून विषबाधा झाल्याने या पाच जणांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, पोस्टमार्टमनंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
या घटनेनंतर शेजाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तसेच दहशतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या कुटुंबाने रात्री नूडल्स खाल्ले होते. त्यानंतर ते झोपले. सकाळी त्यांच्या घरातून कोणतीच हालचाल दिसली नाही. बराच वेळ कुणीच दरवाजा उघडला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना काही तरी गडबड असल्याची शंका आली. जेव्हा शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला तर संपूर्ण कुटुंब बेडवर निपचित पडलेलं होतं. त्यांना जागं करण्याचा शेजाऱ्यांनी प्रयत्न केला. पण काहीच हालचाल झाली नाही. त्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांनी याची खबर दिली.
तीन मुलंही दगावली
ग्रेटर नोएडाच्या अतिरिक्त डीसीपींच्या मते, महेश त्याची पत्नी ललिता आणि तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. फॉरेन्सिक टीमने स्वयंपाक घरातील चहाची भांडी, नूडल्स आणि इतर खाद्य पदार्थांचे सँपल्स गोळा केले आहेत. या गोष्टी लॅबमध्ये पाठवून त्याची तपासणी करण्यात येणार आहे.
विषबाधेची शक्यता
दरम्यान, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून उच्च अधिकारीही घटनास्थळी आले आहेत. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. आम्ही प्रत्येक संभाव्य शक्यतेचा तपास करणार आहोत. ही आत्महत्या आहे की विषारी अन्न खाल्ल्यामुळे मृत्यू झाला याची माहिती घेत आहोत. तसेच या कुटुंबासोबत कुणी घातपात तर केला नाही ना? याचाही तपास करत आहोत. पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच या प्रकरणाचं वास्तविक कारण समोर येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.