नंदुरबारच्या चरणमाळ घाटात लक्झरीला भीषण अपघात; 10 प्रवासी गंभीर जखमी

| Updated on: Sep 11, 2022 | 12:44 AM

चरणमाळ घाटातील एका तीव्र उतारावर चालकाचे लक्झरी बसवरील नियंत्रण सुटले आणि ती बस पलटी होऊन घाटाच्या पायथ्याशी कोसळली आहे.

नंदुरबारच्या चरणमाळ घाटात लक्झरीला भीषण अपघात; 10 प्रवासी गंभीर जखमी
नंदुरबारमध्ये चरणमाळ घाटात लक्झरीला भीषण अपघात
Follow us on

नंदुरबार : राज्यात अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बहुतांश रस्त्यांवर छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. अशातच शनिवारी रात्री नंदुरबार जिल्ह्यातील चरणमाळ घाटात खाजगी लक्झरी बस (Luxury Bus)ला भीषण अपघात (Accident) झाला आहे. त्यात आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी (Injured) झाले असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मुसळधार पावसामुळे मदतकार्यामध्ये अडचणी येत आहेत.

नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात चरणमाळ घाट आहे. हा घाट आधीच अरुंद आणि काही ठिकाणी धोकादायक वळणांचा आहे, त्यातच मुसळधार पावसात या घाटातून मोठ्या गाड्या चालवणे फार अवघड असते.

अशा परिस्थितीत अपघातांना निमंत्रण मिळते. आज रात्री खाजगी लक्झरी बसला झालेला भीषण अपघातही घाटाच्या धोकादायक स्थितीमुळे घडल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

घाटातील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

चरणमाळ घाटातील एका तीव्र उतारावर चालकाचे लक्झरी बसवरील नियंत्रण सुटले आणि ती बस पलटी होऊन घाटाच्या पायथ्याशी कोसळली आहे.

अपघाताची भीषणता तीव्र आहे. त्यामुळे जखमी प्रवाशांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बसमधील 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी

बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्यापैकी किमान 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच घाटापासून काही अंतरावर असलेल्या स्थानिक रहिवाशांनी घाटाच्या दिशेने धाव घेतली.

रहिवासी आणि पोलिसांनी जखमींना वेळीच अपघातग्रस्त लक्झरीमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. यातील ज्या जखमींना बाहेर काढण्यात आले, त्यांना तातडीने खाजगी गाड्यांतून उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

पावसामुळे मदतकार्यात अडचणी

घाटात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिक आणि पोलीस प्रशासनाकडून सुरु असलेल्या मदतकार्यामध्ये अडचणी येत आहेत. लक्झरीचा चालक बसखाली अडकला आहे. त्याला सुखरुप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले जात आहेत.

अपघातस्थळी मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिकांनी हजेरी लावली आहे. अपघाताचे नेमके कारण काय आहे, याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.