Tiger Shroff : गन जाम झाली अन् टायगर वाचला… काय घडलं त्या सेकंदात?
अभिनेता टायगर श्रॉफ जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे. जुहू येथे त्याच्यावर गोळीबार झाला, परंतु हल्लेखोराची पिस्तूल ऐनवेळी जाम झाल्याने त्याचे प्राण वाचले. या घटनेने खळबळ उडवली असून पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

अभिनेता टायगर श्रॉफ कालच्या जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे. आरोपींनी टायगरवर अत्यंत जवळून गोळी झाडली. पण सुदैवाने टायगर त्यातून बचावला. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने चक्र फिरवत तीन संशियत आरोपींना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेचे व्हिडीओही व्हायरल होत असून हल्ला कसा झाला हे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, या हल्ल्लानंतर एक महत्त्वाची अपडेट आली आहे. केवळ काही सेकंदामुळे टायगरचे प्राण वाचल्याचं समोर आलं आहे. आरोपीची पिस्तूल ऐनवेळी जाम झाल्याने टायगरचा जीव वाचल्याचं उघड झालं आहे.
काल जुहू येथील जमनालाल बजाज ग्राऊंडबाहेर हा गोळीबार झाला. तीन आरोपींनी गावठी पिस्तूलमधून टायगरच्या दिशेने गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी एकूण 7-8 गोळ्या झाडल्याचं सांगितलं जातं. त्यापैकी पाच गोळ्या कारला लागल्या, दोन गोळ्यांचं लक्ष्य चुकलं. तर पाचवी गोळी झाडल्यानंतर दुसऱ्या शूटरने टायगर श्रॉफवर जवळून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तूल जाम झाल्याने तो चालवू शकला नाही, असा अंदाज आहे. पिस्तूल जाम झाल्याने काही सेकंदासाठी टायगरला संधी मिळाली आणि तो कार सुस्साट पळवू शकला. जर आरोपीची पिस्तूल जाम झाली नसती तर टायगरच्या जीवावर बेतू शकलं असतं, असं सूत्रांनी सांगितलं.
45 मिनिटे थांबले अन्…
आरोपींनी हल्ला करण्यापूर्वी पूर्ण तयारी केल्याचंही उघड झालं आहे. या आरोपींनी टायगरचं घर आणि फुटबॉलच्या मैदानाची रेकी केली होती, अशी माहिती समोर आली आहे. आरोपी पुष्पा पार्कजवळ सुमारे 45 मिनिटे थांबल्याची सूत्रांची माहिती आहे. हल्ल्यानंतर तिसऱ्या साथीदाराने तयार ठेवलेल्या मोटारसायकलवरून आरोपी फरार झाले. हे आरोपी थेट अंधेरी स्टेशनच्या दिशेने आले. तिथे त्यांनी पोलीस चौकीच्या परिसरात मोटारसायकल सोडली आणि पळून गेले. आरोपी मुंबईबाहेर सुरतच्या दिशेने फरार होण्याच्या तयारीत होते. पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, अटक करण्यात आलेले आरोपी हे तेच आहेत की नाही याची पुष्टी अद्याप झालेली नाही.
पहिल्याने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला…
दरम्यान, आरोपींनी हल्ला करण्यासाठी पल्सर बाईकचा वापर केला होता. पोलिसांनी ही बाईक अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशनजवळून ताब्यात घेतली असून डीएन नगर पोलीस ठाण्यात आणली आहे. या बाईकच्या मालकालाही पोलिसांनी चौकशीला बोलावलं आहे. या बाईकचा पहिला मालक जोगेश्वरी भागातील आहे. त्याने ती दुसऱ्याला विकली होती. दुसऱ्याने ती तिसऱ्याला विकली होती. गोळीबार करणाऱ्यांनी तिसऱ्या मालकाकडून बाईक खरेदी केली होती. परंतु कागदपत्रांचे हस्तांतरण झाले नव्हते, अशी माहिती समोर येत आहे.