Tiger Shroff : अवघ्या 17 तासात मोठी कारवाई, हल्ला करणाऱ्यांमध्ये रॅपिडो रायडर, दोघांच्या मुसक्या आवळल्या; थेट गुजरातला…
अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वेगाने कारवाई करत अवघ्या १७ तासांत दोन संशयितांना ताब्यात घेतले. आरोपी गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना सुरत एक्स्प्रेसमधून पकडण्यात आले. हल्ल्यापूर्वी आरोपींनी टायगरच्या घराची रेकी केली होती. या प्रकरणात गावठी पिस्तुलाचा वापर झाल्याचा संशय असून, अधिक चौकशी सुरू आहे.

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभाग कामाला लागला आहे. मुंबई पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत अवघ्या 17 तासात दोन संशियत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे दोन्ही आरोपी गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या दोन्ही संशियतांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे या चौकशीत काय धक्कादायक माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई पोलिसानी सुरत एक्सप्रेसमधून दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करून तिन्ही आरोपी सुरतच्या दिशेने रवाना झाल्याचा पोलिसांना संशय होता. हे आरोपी गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची टीप मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, ताब्यात घेतलेले आरोपी तेच आहेत की नाही याची अद्याप पुष्टी झालेली नाही. यातील एक आरोपी हा महाराष्ट्रातील असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, पकडण्यात आलेल्या संशियतांपैकी एक जण रॅपिडो रायडर असल्याची माहिती आहे.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील अटक आरोपींची नावे
1. फूल सिंह (वय १७) — हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील बडोदा थुथन येथील रहिवासी.
2. ऋतिक कुमार उर्फ रोशन (वय २२) — मूळचा बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील पिपराई गावचा रहिवासी. सध्या अंधेरी पश्चिम, मुंबई येथे वास्तव्यास. रॅपिडो रायडर म्हणून काम करतो.
3. रेहान (वय १८) — हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील ईदगाह कॉलनी परिसरातील रहिवासी.
आधी रेकी, मग हल्ला
टायगरवर गोळीबार करण्याआधी आरोपींनी काही ठिकाणांची रेकी केल्याचंही उघड झालं आहे. टायगरचे घर आणि फुटबॉल मैदानाचीही रेकी करण्यात आली होती. त्यानंतर हा हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. कोटा पोलिसांच्या मदतीने संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
घराबाहेर सुरक्षेत वाढ
दरम्यान, या हल्ल्यानंतर टायगर श्रॉफ याच्या कार्टर रोड येथील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच टायगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू कारवर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोरांनी गावठी पिस्तूल वापरल्याचा संशय आहे. फॉरेन्सिक विभागाच्या प्राथमिक तपासणीत गावठी पिस्तुल म्हणजेच (कॉपी पीस) मधून फायरिंग केल्याचा संशय आहे. हल्लेखोरांनी एकूण सात ते आठ गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी पाच गोळ्या कारला लागल्या, तर दोन गोळ्यांचे लक्ष्य चुकलं, अशी माहिती समोर आली आहे.
