
राजस्थानच्या करौलीमध्ये PCS ज्योति मौर्य सारखं प्रकरण समोर आलय. प्रेमात पत्नीकडून फसवणूक झाल्यानंतर पतीने पत्नीच एक डार्क सिक्रेट ओपन केलं. बेरोजगार पतीने पत्नीच्या बेकायद सरकारी नोकरीची पोल-खोल केली. आता हे सर्व प्रकरण सीबीआयपर्यंत पोहोचलय. पत्नीला नोकरी गमवावी लागलीच. पण आता हे प्रकरण सीबीआयकडे पोहोचलं आहे. सीबीआयने तिच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
नादौतीमधील रोंसी गावचा निवासी मनीष मीणाने पत्नी सपना मीणाला डमी परीक्षार्थी बसवून रेल्वेत नोकरी मिळवून दिली होती. त्यानंतर काही महिन्यांनी सपनाने मनीषला तो बेरोजगार आहे म्हणून सोडून दिलं. मनीषचा दावा आहे की, लग्नानंतर त्याने सपनाला कोचिंग क्लास लावून दिला. तिला रेल्वे परीक्षेसाठी मदत केली. सपनाचा एक नातेवाईक चेतनरामने 15 लाख रुपये घेऊन डमी परीक्षार्थीच्या मदतीने नोकरी लावून देण्याचा सौदा केला. यामध्ये रेल्वे गार्ड राजेंद्रने एजटची भूमिका वठवली. सपनाच्या जागी लक्ष्मी मीणा नावाच्या मुलीला परीक्षेला बसवलं.
मग, नवऱ्याने काय केलं?
मनीषने आपली जमीन गहाण ठेऊन 15 लाख रुपये कर्ज घेतलं. सपनाला नोकरीला लावलं. पण सपना नोकरीला लागताच तिने सहा महिन्यात मनीषला सोडलं. पत्नीचा विश्वासघात आणि फसवणुकीचा बळी ठरलेल्या मनीषने हे प्रकरण उघड करायच ठरवलं. त्याने रेल्वे सतर्कता विभाग आणि सीबीआयकडे तक्रार केली.
रेल्वेने काय कारवाई केली?
सीबीआयने करौली, कोटा आणि अलवरमध्ये छापेमारी करुन कागदपत्र जप्त केली आहेत. चौकशीत समोर आलय की, सपना मीणाने पॉइंट्समॅनच्या नोकरीसाठी डमी उमेदवार लक्ष्मी मीणाचा वापर केला. चौकशीनंतर रेल्वेने सपना मीणाला नोकरीतून निलंबित केलय. सीबीआयने सपना आणि लक्ष्मी मीणा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.