जमिनीत गाडलेल्या पुरातन सोन्याच्या नावाखाली फसवणूक, वसईत टोळी अटक

| Updated on: Aug 29, 2022 | 11:14 PM

सर्व आरोपींचे मोबाईल लोकेशन घेऊन प्रमोद बडाख यांच्या पथकाने उत्तरप्रदेश येथे सापळा रचला. पोलिसांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

जमिनीत गाडलेल्या पुरातन सोन्याच्या नावाखाली फसवणूक, वसईत टोळी अटक
जमिनीत गाडलेल्या पुरातन सोन्याच्या नावाखाली फसवणूक
Image Credit source: TV9
Follow us on

नालासोपारा : जमिनीत गाडलेल्या पुरातन सोन्याच्या नावाखाली फसवणूक (Fraud) करणाऱ्या टोळीचा वसई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जमिनीत मिळालेले पुरातन सोने (Gold) कमी किंमतीत विकायचे आहे असे आरोपी भासवायचे आणि नागरिकांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करायचे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे कक्ष 03 च्या पथकाने ही कामगिरी केली आहे. उत्तर प्रदेशामधून 4 आरोपींना अटक (Arrest) केले आहे. या आरोपींकडून बनावट सोन्याची पाने, मनी, मण्यांची माळ असा मुद्देमालही जप्त केला आहे.

नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारी टोळी सक्रिय

विशाल धर्मा राय, संजू वालिया राय, शिवराम हिरालाल माली, मीना रामलाल सोलंकी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण उत्तरप्रदेशच्या खेडा फिरोजाबादचे रहिवाशी आहेत. मागच्या काही महिन्यांपासून मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय हद्दीत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली होती.

जमिनीत गाडलेले सोन्याचे पुरातन सोने मिळाले आहे आणि ते कमी किंमतीत विक्री करायचे आहे असे भासवून नागरिकांची फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केला.

हे सुद्धा वाचा

आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पोलीस पथक

मुख्यालय पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे कक्ष शाखा 03 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे, उमेश भागवत, पोलीस हावलंदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, शंकर शिंदे, सचिन घेरे, सागर बावरकर, पोलीस नायक मनोज सकपाळ, पोलीस अंमलदार राकेश पवार, अश्विन पाटील, सुमित जाधव यांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते.

वसईत एका व्यक्तीची 12 लाखाची फसवणूक

या पथकाने तपास सुरू केला असता या टोळीने 25 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता वसई पश्चिम भाजीमार्केट जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पंचवटी हॉटेलजवळ एका अनोळखी इसमाने सुनील प्रविणचंद्र चोक्सी यांचा विश्वास संपादन करून, पितळी धातूचे पाने सोन्याचे असल्याचे भासवून त्यांची 12 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले.

वालीव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल

याबाबत वालीव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा करण्याची आरोपींची पद्धत, त्यांचे ठिकाण, पोशाख यावरून गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषण केले असता हे आरोपी जमिनीत गाडलेले पुरातन सोने असल्याचे बसवून, पितळी बनावट सोने विकून नागरिकांची फसवणूक करून, उत्तर प्रदेशाला फरार होत असल्याचे समोर आले.

मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींविरोधात सापळा रचला

सर्व आरोपींचे मोबाईल लोकेशन घेऊन प्रमोद बडाख यांच्या पथकाने उत्तरप्रदेश येथे सापळा रचला. पोलिसांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून 5 किलो वजनाचे पिवळ्या रंगाचे बनावट सोन्याचे पाने, मनी आणि मण्याची माळ जप्त केली आहे.

या आरोपींची मोठी टोळी आहे. ही टोळी एकट्या दुकाट्या माणसाला गाठतात. त्याचा विश्वास संपादन करतात आणि सोन्याच्या नावाखाली पितळी सोने देऊन आर्थिक फसवणूक करून फरार होतात.

आरोपींना 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

या आरोपींना मंगळवार 30 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांनी अशा भामट्यांना बळी पडू नये असे आवाहन गुन्हे शाखा कक्ष 03 चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी केले आहे. (Theft gang arrested for fraud by giving antique gold at low price in vasai)