भाजप नेता VS भाजपचा उमेदवार? अमरावतीत मोठी खेळी, मुख्यमंत्र्यांचा बच्चू कडूंना फोन

| Updated on: Mar 24, 2024 | 7:44 PM

बच्चू कडू राणा दाम्पत्याच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध आहे. भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली गेली तर आपण वेगळा उमेदवार उभा करु, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. विशेष म्हणजे बच्चू कडू भाजप नेत्यालाच उमेदवार म्हणून उभं करण्याच्या तयारीत आहेत. बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना फोन केलाय. मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना चर्चेसाठी बोलावलं आहे.

भाजप नेता VS भाजपचा उमेदवार? अमरावतीत मोठी खेळी, मुख्यमंत्र्यांचा बच्चू कडूंना फोन
भाजप नेता VS भाजप उमेदवार? अमरावतीत मोठी खेळी, मुख्यमंत्र्यांचा बच्चू कडूंना फोन
Follow us on

आमदार बच्चू कडू अमरावतीत मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघात खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. पण नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांचा विरोध आहे. त्यामुळे बच्चू कडू येत्या 3 एप्रिलला अमरावतीत आपल्या उमेदवाराचा अर्ज भरणार आहेत. विशेष म्हणजे बच्चू कडू यांच्या बाजूने अर्ज भरणारा उमेदवार हा भाजपचा असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अमरावतीत भाजप नेता VS भाजपचा उमेदवार अशी लढत तर होणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतोय. बच्चू कडू यांनी भाजप नेत्याचं नाव अद्याप सांगितलेलं नाही. पण भाजपचा अमरावतीमधील महत्त्वाचा नेते अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांना याबाबतची माहिती दिल्यानंतर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना फोन केला. एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंना 26 मार्चला मुंबईत भेटीसाठी बोलावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अमरावती लोकसभेच्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना बोलावलं आहे. बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर ते काय निर्णय घेतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘राणांविरोधात उमेदवार देण्याची कार्यकर्त्यांची इच्छा’

“आम्ही अमरावतीची लोकसभा जागा लढवत आहोत. सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ज्या राणाने आपल्याला एवढं अपमानित केलं. काय-काय बोलले ते सांगणं कठीणच आहे. मी पुन्हा सांगू शकत नाही. आता सुद्धा उमेदवार असताना लांडगे फांडगे सगळे प्रचाराला येतील, म्हणजे निवडणुकीत स्वत: उमेदवार असताना असे वक्तव्य केले जात असतील तर कार्यकर्त्यांची मानसिकत नाही. आपण राजकारणात पुन्हा झिरो झालो तरी चालेल. पण एवढी शरणागती पत्कारायची नाही. काही असेल तर आघाडीकडून उमेदवारी मागा. पण राणाचा प्रचार करायचा नाही, असं कार्यकर्त्यांचं मत आहे. कार्यकर्ते फोन करुन, स्वत: भेटून पक्ष सोडण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागतोय”, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

‘सर्वपक्षीय नाराज लोकांचा उमेदवार असेल’, बच्चू कडू यांचं सूचक वक्तव्य

“आम्ही चांगल्या उमेदवाराच्या शोधात होतो. चांगला उमेदवार आम्हाला भाजपमधूनच भेटला आहे. ते नाव जाहीर होईल तेव्हा बऱ्यापैकी काम झालेलं असेल. आम्ही दलित बांधवांच्या संघटना, मुस्लिम बांधवांच्या संघटना यांना भेटत आहोत. आम्ही आज बऱ्याच भेटीगाठी घेतल्या. भाजपमध्ये काही नाराज कार्यकर्तेदेखील आहेत, ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हवे आहेत. पण राणा भाजपात नको, असा काही कार्यकर्त्यांचा सूर आहे. शिवसेनेला तिकीट न मिळाल्याने त्यांचीदेखील तयारी आहे. त्यामुळे सगळी बांधणी एकमुखाने सुरु आहे. सर्वपक्षीय उमेदवार होऊ शकतो. सर्वपक्षीय नाराज लोकांचा उमेदवार होऊ शकतो. त्या नाराजीचा फायदा आम्हाला निश्चित लोकसभेत होईल”, अशी महत्त्वाची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

आमचे वर्धामध्ये कार्यकर्ते खूप आग्रही आहेत. वर्धाचे दोन मतदारसंघ अमरावतीत आहेत. वर्धेत आपण स्वत: उभे राहा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. या सगळ्या गोष्टींवर आम्ही निर्णावर येऊ. आता अमरावतीचा निर्णय आम्ही घेतला. 3 तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करु. वर्धेचा निर्णय चर्चा करुन घेऊ, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली.

महायुतीच्या विरोधात उमेदवार का?

भाजपने आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही कारणांमुळे आम्ही अमरावतीत उमेदवार उभा करतोय. भाजपचं रवी राणा यांच्याबद्दल जे अतिप्रेम आहे, आमचे दोन आमदार आणि आमची ताकद असताना जाणीवपूर्वक न विचारणे आणि एकतर्फी निर्णय घेणं हे चुकीचं आहे. ज्याच्या घरी जेवण आहे त्यानेत रंगबाजी करुन जीव घालावं हे कुणी ऐकणार नाही. आमची ती मानसिकता नाही आणि आमच्या ते रक्तात नाही, असं बच्चू कडू म्हणाले.

“स्वत: उमेदवारी असलेली व्यक्ती अशी भाषा करत असेल, यावेळेस तर अधिक नम्र असलेला व्यक्ती अधिक नम्न असतो. दादागिरी करणारी व्यक्ती झुकून निवडणुकीसमोर जात असतो. पण यांची एवढी दादागिरी का आहे? यांच्या पाठिमागे कोण आहे? ते पाहिलं पाहिजे. दादागिरी करणार असाल तर आम्ही तुम्हाला पाडू ना. चारी मुंड्या चित करु”, असंदेखील बच्चू कडू यावेळी म्हणाले.