गरीब बॉयफ्रेंडला सोडून श्रीमंत बॉससोबत केलं लग्न, 52 वर्षांपूर्वीच्या या चित्रपटातील सर्व गाणी झालेली सुपरहिट
गरीब बायफ्रेंडला सोडून श्रीमंत बॉससोबत केलं लग्न. 52 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील 6 च्या सहा गाणी झालेली सुपरहिट. आजही या गाण्याची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ.

1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडली होती. गरिबी, बेरोजगारी, महागाई आणि कुटुंबाच्या सुखासाठी संघर्ष करणाऱ्या सामान्य माणसाची कहाणी या चित्रपटातून मांडण्यात आली होती. या चित्रपटातील कथानक प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडले गेले आणि त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. आपण बोलत आहोत मनोज कुमार यांच्या ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटाबद्दल.
मनोज कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात मनोज कुमार, शशी कपूर, अमिताभ बच्चन, झीनत अमान आणि मौसमी चटर्जी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाची कथा भरत या तरुणाभोवती फिरते, जो आर्थिक अडचणींचा सामना करत आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतो.
भरतच्या आयुष्यात शीतल या तरुणीचे महत्त्वाचे स्थान असते. मात्र, गरिबीमुळे शीतल भरतला सोडून श्रीमंत व्यावसायिक मोहन बाबू याच्याशी लग्न करते. या कथेतून प्रेम, आर्थिक विषमता आणि सामाजिक परिस्थितीचे चित्रण करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांनी भरतच्या भावाची, विजयची भूमिका साकारली होती, तर मौसमी चटर्जी तुलसीच्या भूमिकेत दिसल्या होत्या.
सहा गाण्यांनी सजला होता संगीत अल्बम
‘रोटी कपडा और मकान’च्या कथेसोबतच त्यातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते. लता मंगेशकर, मुकेश, महेंद्र कपूर, नरेंद्र चंचल आणि जानी बाबू कव्वाल यांच्या आवाजातील गाणी लोकप्रिय ठरली. 161 मिनिटांच्या या चित्रपटात एकूण 37.21 मिनिटांची गाणी होती, अशी माहिती दिली जाते.
‘हाय हाय ये मजबूरी’ गाण्याशी जोडलेला किस्सा
या सिनेमातील ‘हाय हाय ये मजबूरी’ हे गाणे विशेष गाजले. मिळालेल्या माहितीनुसार, हे गाणे सुरुवातीला मौसमी चटर्जी यांच्या व्यक्तिरेखेसाठी विचारात घेण्यात आले होते. मात्र, त्यांच्या गर्भावस्थेमुळे अखेरीस हे गाणे झीनत अमान यांच्यावर चित्रित करण्यात आले.
बॉक्स ऑफिसवर केली कोट्यवधींची कमाई
‘रोटी कपडा और मकान’ हा 1974 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने 5.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. 2023 मधील महागाईच्या तुलनेत ही रक्कम 157 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.