
1986 साली प्रदर्शित झालेला 2 तास 16 मिनिटांचा 'चमेली की शादी' हा चित्रपट 80 च्या दशकातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक मानला जातो. आपल्या वेगळ्या कथानकामुळे आणि हलक्याफुलक्या विनोदी शैलीमुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले.

विशेष म्हणजे, काळ लोटला तरी या चित्रपटाची लोकप्रियता कमी झालेली नाही; उलट आजही तो तितक्याच उत्साहाने पाहिला जातो. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अनिल कपूर आणि अमृता सिंह झळकले होते.

‘चमेली की शादी’ची कथा एका छोट्या शहरातील पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात जातीय भेदभाव, सामाजिक परंपरा आणि प्रेमविवाह यांसारख्या विषयांना हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आले आहे.

चित्रपटाची कथा जितकी लोकप्रिय ठरली, तितकीच त्यातील गाणीही गाजली. ‘पीना हराम है’, ‘तू जहां भी चलेगा’, ‘उतर है अखाड़े में’, ‘मोहब्बत के दुश्मन’ आणि ‘चमेली की शादी’ ही गाणी त्या काळात विशेष लोकप्रिय ठरली होती आणि आजही रसिकांच्या ओठांवर ऐकायला मिळतात.

या चित्रपटाचे बजेट सुमारे 1.50 कोटी रुपये होते तर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तब्बल 4.50 कोटी रुपयांची कमाई केली. म्हणजेच, चित्रपटाने आपल्या बजेटपेक्षा तीनपट जास्त कमाई करत व्यावसायिक यश मिळवले. त्या काळातील ही कमाई मोठी मानली जात होती.

गेल्या काही वर्षांत हा चित्रपट यूट्यूबवर पुन्हा ट्रेंड होताना दिसत आहे. नवीन पिढी देखील या चित्रपटाचा आनंद घेत आहे. तसेच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Jio Hotstar वरही उपलब्ध आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना तो सहज पाहता येतो.