प्रियकराला गुपचूप घरी बोलावण्यासाठी खास गाणं, ठरलं प्रचंड सुपरहिट, 33 वर्षांपासून चर्चेत
33 वर्षांपूर्वीचं गोविंदाचं सर्वात सुपरहिट गाणं, ज्यामधील गोविंदा-शिल्पाच्या डान्सने जिंकलेली सर्वांची मनं. कुमार सानू- साधना सरगम यांच्या आवाजामुळे आजही या गाण्याची प्रचंड चर्चा.

हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार गोविंदाने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट आणि गाणी दिली आहेत. विशेषतः 90च्या दशकातील त्याच्या गाण्यांमध्ये रोमँटिक अंदाजासोबतच देसी ठसका आणि खट्याळपणाची खास झलक पाहायला मिळायची. याच काळातील त्यांचं एक गाणं तब्बल 33 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
1993 मध्ये दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा ‘आंखें’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील ‘अंगना में बाबा, दुआरे पे मां’ हे गाणं त्याकाळी चांगलंच गाजलं. कुमार सानू आणि साधना सरगम यांनी गायलेल्या या गाण्याला इंदीवर यांनी शब्द दिले होते, तर संगीत बप्पी लाहिरी यांनी दिलं होतं.
गाण्यात देसी आणि खट्याळ अंदाज
या गाण्यात गोविंदा आणि अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांचा मस्तीभरा अंदाज पाहायला मिळतो. ‘खेत गए बाबा, बाजार गई मां, अकेली हूं घर में तू आजा बलमा’ या ओळींमधून गाण्याचा देसी आणि खट्याळ अंदाज स्पष्टपणे जाणवतो. प्रियकराला घरी बोलावण्यासाठी तरुणी करत असलेली मजेशीर शक्कल आणि त्यांच्यातील संवाद या गाण्याला आणखी खास बनवतो.
गाण्याचे साधे-सोपे आणि बोलभाषेतील शब्द, लोकसंगीताची झलक असलेली चाल आणि कुमार सानू-साधना सरगम यांच्या आवाजामुळे हे गाणं वेगळं ठरलं. रोमँटिक गाण्याला विनोदी आणि देसी रंग देण्याची अनोखी शैली या गाण्यात पाहायला मिळते.
90sच्या चाहत्यांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक
‘आंखें’ चित्रपटात गोविंदा याने दुहेरी भूमिका साकारली होती. चित्रपटात त्याच्यासोबत चंकी पांडे, राज बब्बर, कादर खान, शक्ती कपूर, शिल्पा शिरोडकर आणि ऋतु शिवपुरी यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. दोन खोडकर भावांच्या कथाभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
90च्या दशकातील अनेक गाणी काळाच्या ओघात विस्मरणात गेली, मात्र ‘अंगना में बाबा, दुआरे पे मां’ हे गाणं आजही जुन्या आठवणींना उजाळा देतं. गोविंदाचा भन्नाट डान्स, शिल्पा शिरोडकरचा अंदाज आणि गाण्यातील देसी खट्याळपणा यामुळे हे गाणं आजही 90sच्या चाहत्यांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.