चित्रपटापेक्षा या गाण्याने केली होती सर्वात जास्त कमाई, 32 वर्षानंतर देखील प्रचंड सुपरहिट

32 वर्षांपूर्वीचं 4 मिनिट 32 सेकंदाचं सर्वात सुपरहिट गाणं, अभिजीत यांचा आवाज आणि सैफ अली खानचा डान्समुळे ठरलं प्रचंड लोकप्रिय. आजही प्रत्येक पार्टीची आहे शान.

चित्रपटापेक्षा या गाण्याने केली होती सर्वात जास्त कमाई, 32 वर्षानंतर देखील प्रचंड सुपरहिट
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 16, 2026 | 6:56 PM

90 च्या दशकातील बॉलिवूड गाण्यांची जादू आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या काळात अनेक गाणी प्रदर्शित झाली, ज्यांनी आपल्या तालावर चाहत्यांना थिरकायला भाग पाडले. यापैकीच एक लोकप्रिय गाणे म्हणजे 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये दिल्लगी’ चित्रपटातील ‘ओले ओले’. अभिजीत भट्टाचार्य यांच्या आवाजातील हे गाणं सैफ अली खानवर चित्रित करण्यात आले होते. आजही 90 च्या दशकातील लोकप्रिय पार्टी साँग्समध्ये या गाण्याचा आवर्जून उल्लेख केला जातो.

‘ओले ओले’ गाण्याच्या निर्मितीमागची कहाणीही तितकीच रंजक आहे. मिळालेल्या वृत्तांनुसार, संगीतकार दिलीप सेन आणि समीर सेन हे ‘ये दिल्लगी’च्या संगीतावर काम करत होते. त्याचदरम्यान एका पावसाळी दिवशी कारच्या छतावर पडणारा पावसाचा आवाज ऐकून दिलीप सेन यांनी तो आवाज गारपीटीसारखा वाटत असल्याचे म्हटले. याच कल्पनेतून ‘ओले ओले’ या शब्दाचा जन्म झाला.

यानंतर या शब्दावर आधारित चाल तयार करण्यात आली आणि गीतकार समीर यांनी त्याला गाण्याचे स्वरूप दिले. सुरुवातीला हे गाणे इतके मोठे हिट ठरेल, याची संगीतकारांनाही कल्पना नव्हती. काही वृत्तांनुसार, त्यांनी सुरुवातीला हे गाणं यश चोप्रांना ऐकवण्यास टाळाटाळ केली होती. मात्र, गाणे ऐकल्यानंतर यश चोप्रांना ते खूप आवडले.

सैफ अली खानच्या डान्सने गाणे गाजले

‘ओले ओले’ हे गाणे सैफ अली खानच्या विकी या व्यक्तिरेखेवर चित्रित करण्यात आले होते. गाण्यातील सैफचा मस्तीभरा अंदाज, डान्स आणि त्याचा लूक त्यावेळच्या तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला होता. अभिजीत भट्टाचार्य यांनी या गाण्याला आवाज दिला, तर दिलीप सेन आणि समीर सेन यांनी संगीतबद्ध केले. गाण्याचे बोल समीर यांनी लिहिले होते.

‘ये दिल्लगी’ चित्रपट 6 मे 1994 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सैफ अली खानसोबत अक्षय कुमार आणि काजोल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

32 वर्षांनंतरही गाण्याची लोकप्रियता कायम

‘ओले ओले’ हे केवळ चित्रपटातील गाणे राहिले नाही, तर ते 90 च्या दशकातील पार्टी साँगची ओळख बनले. गाण्याचे सोपे बोल, उत्साही संगीत आणि सैफ अली खानचा डान्स यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. काही वृत्तांमध्ये या गाण्याने चित्रपटापेक्षाही मोठे यश मिळवल्याचे नमूद केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us