हे गाणं ऐकताना लोक थिएटरमध्ये नाणी फेकायचे, इतकं सुपरहिट गाणं की 5 चित्रपटांमध्ये वापरण्यात आलं
49 वर्षांपूर्वी थिएटरमध्ये हे गाणं सुरु होताच लोक नाणी फेकायची. एक-दोन नाही तर तब्बल 5 चित्रपटांमध्ये वापरण्यात आलं हे गाणं. इतकं सुपरहिट की ऐकताच लोक ठेका धरतात.

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गाणी काळाच्या पुढे जात प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहतात. अशाच अजरामर गाण्यांपैकी एक म्हणजे ‘मुंगड़ा मुंगड़ा मैं गुड़ की डली’. 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंकार’ या चित्रपटातील या गाण्याने त्यावेळी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या गाण्यावर अभिनेत्री हेलेन यांनी केलेला दमदार डान्स आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सांगितलं जातं की, गाण्याची क्रेझ इतकी होती की काही ठिकाणी थिएटरमध्ये प्रेक्षक आनंद व्यक्त करत चक्क नाणी उधळायचे.
‘मुंगड़ा मुंगड़ा’ या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले होते, तर संगीतकार राजेश रोशन यांनी या गाण्याला संगीत दिलं होतं. हे गाणं उषा मंगेशकर यांनी आपल्या खास आवाजात गायलं. मात्र, हे गाणं लोकप्रिय होण्यामागे हेलेन यांच्या जबरदस्त नृत्याचाही मोठा वाटा होता. त्यांच्या एनर्जेटिक परफॉर्मन्समुळे हे गाणं एव्हरग्रीन डान्स नंबर ठरलं.
तब्बल 5 चित्रपटात वापरण्यात आलं गाणं
विशेष म्हणजे ‘मुंगड़ा मुंगड़ा’ हे गाणं वेगवेगळ्या काळात तब्बल पाच चित्रपटांमध्ये वापरण्यात आलं. 1977 मध्ये ‘इंकार’मध्ये हे गाणं आल्यानंतर1984 मध्ये ‘अंदर बाहर’ चित्रपटात त्याचा वापर करण्यात आला. या आवृत्तीत अभिनेत्री जयश्री टी. दिसल्या होत्या.
त्यानंतर 1990 मध्ये सनी देओलच्या ‘घायल’ चित्रपटातही ‘मुंगड़ा मुंगड़ा’ पार्श्वभूमीत ऐकायला मिळालं. २०१३ मध्ये ‘कमांडो’ चित्रपटासाठी या गाण्याला पुन्हा नव्या अंदाजात सादर करण्यात आलं. यावेळी सुनिधी चौहान यांनी गाणं गायलं होतं.
यानंतर 2019 मध्ये ‘टोटल धमाल’मध्ये ‘मुंगड़ा’चा आणखी एक नवा अंदाज पाहायला मिळाला. गौरव आणि रोशिन यांनी या गाण्याचं रीमिक्स व्हर्जन तयार केलं होतं. या आवृत्तीत अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा यांची स्पेशल अपीअरन्स होती.
‘इंकार’लाही मिळाला गाण्याच्या लोकप्रियतेचा फायदा
विनोद खन्ना यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘इंकार’ चित्रपटाचं दिग्दर्शन राज सिप्पी यांनी केलं होतं. या चित्रपटाचं बजेट अंदाजे 1.10 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं तर चित्रपटाने सुमारे 3.80 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे त्या काळात ‘इंकार’ला यशस्वी चित्रपट मानलं गेलं. त्यात ‘मुंगड़ा मुंगड़ा’च्या जबरदस्त लोकप्रियतेनेही चित्रपटाच्या चर्चेला चांगलीच रंगत आणली.
आज अनेक जुन्या गाण्यांचे रीमेक आणि रिमिक्स केले जात असले, तरी ‘मुंगड़ा मुंगड़ा’ची लोकप्रियता अनेक दशकांनंतरही कायम आहे, हेच या गाण्याच्या अजरामरतेचं मोठं उदाहरण आहे.