चहाची चव वाढवणाऱ्या दोन मसाल्यांवरून गाण्याचं नाव; ठरलं इतकं सुपरहिट की आजही प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये
8 वर्षांपूर्वीचं सर्वात सुपरहिट पंजाबी गाणं, ज्यामध्ये वापरण्यात आले आहेत चहा बनवण्यासाठीचे दोन मसाले. इतकं सुंदर गाणं की युट्यूबवर या गाण्याने रचला आहे इतिहास.

पंजाबी संगीताची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. देशासोबतच परदेशातही पंजाबी गाणी मोठ्या प्रमाणात ऐकली जातात. याच लोकप्रियतेचं उत्तम उदाहरण म्हणजे 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लॉन्ग लाची’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक. नीरू बाजवा आणि एमी विर्क यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली.
‘लॉन्ग लाची’ हे गाणं टी-सीरीज अपना पंजाब या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आलं होतं. रिलीज झाल्यानंतर या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आजही ते भारतातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या गाण्यांपैकी एक असून, यूट्यूबवर या गाण्याने 1.56 अब्जहून अधिक व्ह्यूज मिळवल्याचं सांगितलं जातं.
या गाण्याला मन्नत नूर यांनी आवाज दिला आहे. त्यांचं खरं नाव केलमाश देवी असून त्या जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या गोड आणि मातीतला सुगंध असलेल्या आवाजाने ‘लॉन्ग लाची’ला एक वेगळीच ओळख मिळवून दिली.
पंजाबी लोकसंगीताची झलक
गाण्याचे बोल हरमनजीत यांनी लिहिले असून संगीत गुरमीत सिंह यांचं आहे. तर कंपोझिशनमध्ये अमन जय यांचाही सहभाग होता. पंजाबी लोकसंगीताची झलक आणि आधुनिक संगीताचा सुंदर मेळ या गाण्यात पाहायला मिळतो.
‘लॉन्ग लाची’चा सर्वात मोठा विशेष म्हणजे त्याची साधी, रोमँटिक आणि पारंपरिक पंजाबी ढब. गाण्यात ‘लवंग’ आणि ‘वेलची’ यांचा संदर्भ घेत प्रियकर-प्रेयसीच्या नात्याची तुलना केली आहे. जसं लवंग आणि वेलची एकमेकांशिवाय अपूर्ण वाटतात, त्याचप्रमाणे प्रेमात असलेली दोन माणसंही एकमेकांशिवाय अधुरी आहेत असा भाव गाण्यातून व्यक्त होतो.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचं आवडतं गाणं
प्रेयसी आपल्या प्रियकराविषयीची प्रेमाची ओढ, हळुवार तक्रार आणि मनातील भावना गाण्यातून व्यक्त करते. पारंपरिक पंजाबी शब्दरचना, गोड चाल आणि आकर्षक कोरिओग्राफी यामुळे हे गाणं लग्नसोहळे, कौटुंबिक कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळतं.
विशेष म्हणजे, या गाण्यात कोणताही अनावश्यक गोंगाट किंवा अश्लीलता नसून, प्रेमाची भावना अतिशय सहज आणि सुंदर पद्धतीने मांडण्यात आली आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला हे गाणं आवडतं.