वाढदिवसानंतर प्राजक्ता माळी थेट शेतात, मातीत उतरून केली भाताची लागवण, Video व्हायरल
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या यंदाचा वाढदिवस एकदम हटके पद्धतीने साजरा केला आहे. अशातच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक खास क्षणही चाहत्यांसोबत शेअर करत असते. निसर्ग, शेती आणि आपल्या मातीशी असलेलं नातं जपणारी प्राजक्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या एका खास पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाढदिवसाच्या दिवशी ग्लॅमरस अंदाजात सेलिब्रेशन करण्याऐवजी प्राजक्ताने चक्क शेतात उतरून भाताची लागवण केली.
प्राजक्ताने 8 ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस साजरा केला. याच दिवशी तिने शेतात भात लावणी करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोंमध्ये ती चिखलाने भरलेल्या शेतात उतरून भाताची रोपं लावताना दिसत आहे. तिच्यासोबत तिच्या जवळच्या व्यक्तीही या श्रमदानात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
चाहत्यांकडून होतंय प्रचंड कौतुक
या पोस्टला प्राजक्ताने अतिशय खास आणि मनापासून कॅप्शन दिलं आहे. ‘शेतकरी प्रमाणपत्र आहेच, त्याला वाढदिवसाला जागले, भात शेतीत (इंद्रायणी) तासभर राबलो.. श्रमदान’ असं तिने म्हटलं आहे. यासोबतच तिने हा अनुभव तिच्यासाठी ‘बेस्ट बर्थ डे मेमरी’ असल्याचंही सांगितलं आहे.
ग्लॅमरच्या दुनियेत काम करणाऱ्या अभिनेत्रीने वाढदिवसाच्या दिवशी अशा पद्धतीने शेतीत श्रमदान केल्याने तिच्या चाहत्यांकडून तिचं कौतुक होत आहे. स्वतःच्या शेतात प्रत्यक्ष उतरून काम करण्याचा आनंद प्राजक्ताने या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
इंद्रायणी भातशेतीत केलं श्रमदान
प्राजक्ताने आपल्या शेतात इंद्रायणी भाताची लागवड केली आहे. भात लावणीचा अनुभव घेताना तिने जवळपास तासभर शेतात काम केल्याचं सांगितलं आहे. तिच्या या पोस्टमधून शेतीच्या कामातील कष्ट, मातीशी असलेलं नातं आणि ग्रामीण जीवनातील साधेपणा याची झलक पाहायला मिळते.
अभिनेत्री असूनही आपल्या मुळांशी जोडलेलं राहण्याचा प्राजक्ताचा प्रयत्न तिच्या चाहत्यांना विशेष आवडतो. त्यामुळेच तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया देत तिचं कौतुक केलं आहे.
मात्र, यंदाचा तिचा वाढदिवस नेहमीच्या सेलिब्रेशनपेक्षा वेगळा ठरला. शेतात उतरून भाताची लावणी करत, मातीशी नातं जोडत आणि श्रमदान करत तिने वाढदिवस साजरा केला. त्यामुळेच तिच्यासाठी हा दिवस केवळ वाढदिवस न राहता आयुष्यभर लक्षात राहणारी ‘बेस्ट बर्थ डे मेमरी’ ठरला आहे.