आजही स्वतःला त्यासाठी माफ करू शकत नाही..; लेकीबद्दल काय म्हणाले अनिल कपूर?
Anil Kapoor: ‘इंडिया के टॉप 1 पर्सेंट’ या क्विझ शोचं सूत्रसंचालन सांगताना अभिनेते अनिल कपूर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक अत्यंत भावनिक प्रसंग सांगितला. त्या गोष्टीचा पश्चात्ताप आजही होत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच फिटनेस आणि कुटुंबाशी असलेल्या जवळच्या नात्यासाठीही ओळखले जातात. मात्र, नुकत्याच झालेल्या एका संवादात त्यांनी आयुष्यातील अशी आठवण सांगितली, ज्याचा पश्चात्ताप आजही त्यांच्या मनात आहे. मुलगी रिया कपूरच्या जन्माच्या वेळी आपण हॉस्पिटलमध्ये उशिरा पोहोचलो होतो आणि त्या प्रसंगासाठी आजही स्वतःला माफ करू शकलो नसल्याचं अनिल कपूर यांनी सांगितलं. अनिल कपूर सध्या ‘इंडिया के टॉप 1 पर्सेंट’ या क्विझ शोचं सूत्रसंचालन करत आहेत. 19 सप्टेंबर 2026 पासून सुरू झालेल्या या शोदरम्यान एका स्पर्धकाशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील हा प्रसंग सांगितला. कुटुंबासाठी काम करणं महत्त्वाचं असलं तरी कुटुंबाला वेळ देणंही तितकंच गरजेचं आहे, हे आपण आता शिकत असल्याचं त्यांनी म्हटलं.
अनिल कपूर यांनी सांगितलं की, रियाचा जन्म झाला तेव्हा ते कामात व्यस्त होते. त्यांनी संपूर्ण रात्र शूटिंग केलं होतं. त्यानंतर त्यांना झोप लागली आणि ते उठले, तेव्हा रियाचा जन्म आधीच झाला होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत मुलीचा जन्म झाला होता. त्यामुळे आपल्या मुलीच्या जन्माचा तो खास क्षण प्रत्यक्ष अनुभवता आला नाही, याची खंत त्यांना आजही आहे. याच प्रसंगाचा उल्लेख करताना त्यांनी आपण हॉस्पिटलमध्ये उशिरा पोहोचलो होतो आणि आजपर्यंत स्वतःला त्यासाठी माफ करू शकलो नसल्याचं सांगितलं.
याच संवादात अनिल कपूर यांनी त्यांच्या दोन्ही मुलींबद्दलही प्रेम व्यक्त केलं. सोनम कपूर आणि रिया कपूर या त्यांच्या दोन मुली असून, मुलगी असणं ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन मुली असल्याने हा आनंद आपल्यासाठी ‘डबल बोनस’ असल्याचं ते म्हणाले. अनिल कपूर यांनी आपल्या जावयांचंही कौतुक केलं. व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच कुटुंबासाठी वेळ कसा काढता येतो, याचं उदाहरण त्यांनी त्यांच्याकडून घेतल्याचं सांगितलं.
रिया कपूर ही अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांची धाकटी मुलगी आहे. ती चित्रपट निर्माती आणि स्टायलिस्ट म्हणून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘क्रू’ यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीशी तिचं नाव जोडलेलं आहे.