‘मी डाएटवर आहे…’ गणपतीच्या प्रसादावरून रणबीर कपूर ट्रोल, अंजली अरोरा थेट म्हणाली…
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा प्रसाद नाकारण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर अभिनेत्री अंजली अरोराने प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाली अंजली अरोरा?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर प्रसाद खाण्यास नकार देताना दिसत आहे. ‘मी डाएटवर आहे’, असं म्हणत त्याने प्रसाद घेण्यास नकार दिल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. यानंतर काही सोशल मीडिया युजर्सनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता अभिनेत्री अंजली अरोराने या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अंजली अरोरा सध्या तिच्या आगामी ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ या चित्रपटामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी तिला रणबीर कपूरच्या व्हायरल व्हिडीओबाबत विचारण्यात आलं. यावर तिने प्रसादाचं महत्त्व सांगितलं.
अंजली अरोरा काय म्हणाली?
अंजली म्हणाली, “मी स्वतः नुकतीच घरी गणपती बाप्पाची स्थापना करून आले आहे. मला गोड पदार्थ खूप आवडतात. आपण जो प्रसाद घेतो, तो देवाचा आशीर्वाद असतो. प्रसाद खाल्ल्याने वजन वाढत नाही, तर आपल्याला सद्बुद्धी मिळते.”
पुढे ती म्हणाली की, प्रसाद जास्त प्रमाणात खाण्याची गरज नाही, मात्र थोडा-थोडा प्रसाद नक्की खायला हवा. देवाचा आशीर्वाद कधी आणि कोणत्या रूपात मिळेल, हे सांगता येत नाही, असंही तिने नमूद केलं.
अंजली अरोरा साकारणार सीता मातेची भूमिका
अंजली अरोरा ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ या चित्रपटात सीता मातेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, चित्रपट 25 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात देव शर्मा भगवान श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर रजनीश दुग्गल यांनी रावणाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक सिंह यांनी केलं आहे.
रणबीर कपूरचा व्हिडीओ जुना
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर गणपती बाप्पाचं दर्शन घेताना दिसतो. त्यानंतर उपस्थित व्यक्ती त्याला प्रसाद घेण्यास सांगतात. मात्र, रणबीर “मी डाएटवर आहे,” असं म्हणत प्रसाद खाण्यास नकार देतो.
दरम्यान, सोशल मीडियावर चर्चेत असलेला हा व्हिडीओ यावर्षीचा नसून जुना असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे व्हिडीओच्या आधारे सुरू झालेल्या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.