Anuradha Paudwal : मी माझ्या 25 दिवसांच्या मुलीला गमावलं अन्…अनुराधा पौडवाल यांनी सांगितला कठीण काळ
Anuradha Paudwal : अनुराधा पौडवाल यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला आहे.

सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आता चित्रपटांतील गाणी गात नसतील, पण एकेकाळी त्यांनी प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केलं होतं. बऱ्याच काळानंतर त्या एका मुलाखतीत समोर आल्या आणि त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला. अनुराधा पौडवाल यांच्या ३५ वर्षीय मुलाचं निधन झालं हे सर्वांनाच माहीत आहे, पण अलीकडेच गायिकेनं खुलासा केला की त्यांनी आपली एक मुलगीही गमावली आहे.
अनुराधा पौडवाल यांनी सांगितला प्रसंग
शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत अनुराधा पौडवाल यांनी सांगितलं की, त्यांच्या २५ दिवसांच्या मुलीच्या मृत्यूनं त्यांना मोठा धक्का बसला होता. गायिकेला विचारण्यात आलं की, त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का कोणता होता. त्यावर अनुराधा म्हणाल्या, ‘मी माझ्या 25 दिवसांच्या मुलीला गमावलं. तोच काळ होता जेव्हा मी सर्व काही सोडून देण्याचा निर्णय घेतला. मी संगीत सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, मी दक्षिणेश्वर येथील काली मंदिरात गेले. तिथे मी एक इच्छा व्यक्त केली आणि ती पूर्ण झाली.’ २०२० मध्ये, अनुराधा यांच्या ३५ वर्षीय मुलाचा किडनी निकामी झाल्यानं मृत्यू झाला, तेव्हा त्यांना दुःखाचा मोठा धक्का बसला होता.
अनुराधा पौडवाल यांचं लग्न आणि मुलं
अनुराधा यांचं लग्न भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी झालं होतं. या जोडप्याने चित्रपटगीते आणि भक्तिगीते यांसारख्या अनेक संगीत प्रोजेक्टवर एकत्र काम केलं. अरुण यांचं १९९१ मध्ये निधन झालं. आता अनुराधा यांना फक्त एकच मुलगी असून तिचं नाव कविता पौडवाल आहे.
दरम्यान, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अनुराधा यांनी एका रेडिओ कार्यक्रमात गाणं गायलं होतं. त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात १९७३ मध्ये ‘अभिमान’ या चित्रपटातून केली. या काळात अनुराधा यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केलं. बॉलिवूड सोडल्यानंतर अनुराधा यांनी भक्तीगीतं गाण्यास सुरुवात केली. हिंदू भजनांव्यतिरिक्त, त्यांनी काही इस्लामिक, ख्रिश्चन, जैन, बौद्ध आणि शीख भक्तीगीतेही गायली आहेत.
