आशा भोसले यांनी श्वास रोखून गायलं गाणं, रिलीज होताच नंबर 1; तरी रेडिओवर झालेलं बॅन

Asha Bhosle Song: बंदी आणि वाद असूनही गाण्याची लोकप्रियता कमी झाली नाही. उलट काळाच्या ओघात हे गाणं हिंदी सिनेमाच्या इतिहासातील एक आयकॉनिक गाणं बनलं.

आशा भोसले यांनी श्वास रोखून गायलं गाणं, रिलीज होताच नंबर 1; तरी रेडिओवर झालेलं बॅन
आशा भोसले
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 30, 2026 | 2:38 PM

Asha Bhosle: हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार गाण्यांचा विषय निघाला की आशा भोसले यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या आवाजातील वेगवेगळ्या छटा आणि प्रयोगशीलतेमुळे त्यांनी अनेक गाणी अजरामर केली. मात्र, त्यांच्या एका गाण्याचा किस्सा आजही तितकाच रंजक आहे. तब्बल 55 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं ‘दम मारो दम’ हे गाणं तयार करताना आशा भोसले यांनी काही मिनिटांसाठी श्वास रोखून गाण्याचा खास अंदाज साधला होता. विशेष म्हणजे हेच गाणं प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर रेडिओवर काही काळासाठी बॅनही करण्यात आलं होतं. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या देव आनंद आणि झीनत अमान यांच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ चित्रपटातील ‘दम मारो दम’ हे गाणं आजही हिंदी सिनेमातील कल्ट साँग म्हणून ओळखलं जातं.

आर.डी. बर्मन म्हणजेच पंचम दा यांनी या गाण्याला संगीत दिलं, तर आनंद बक्षी यांनी गीत लिहिलं होतं. गाण्यात झीनत अमान यांच्यावर हिप्पी संस्कृतीची छटा असलेला लूक दाखवण्यात आला होता. या गाण्यासाठी आर.डी. बर्मन यांना आवाजात एक वेगळा ‘नशा’, जडपणा आणि ठहराव हवा होता. हा परिणाम साधण्यासाठी आशा भोसले यांनी गाताना काही मिनिटं श्वास रोखून आवाजावर नियंत्रण ठेवलं होतं. त्यांच्या आवाजातील या अनोख्या प्रयोगामुळे गाण्याला अपेक्षित वेगळी अनुभूती मिळाली. आशा भोसले यांनी या गाण्यासाठी सुमारे सहा मिनिटे श्वास रोखण्याचा सराव केला होता.

Loading...

12 आठवडे नंबर वन

गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. ‘दम मारो दम’ची धून, आशा भोसले यांचा आवाज आणि पडद्यावरील झीनत अमान यांची स्टाइल यामुळे हे गाणं तरुणाईमध्ये विशेष गाजलं. 1972 मध्ये ‘बिनाका गीतमाला’च्या वार्षिक यादीत हे गाणं अव्वल ठरलं. इतकंच नव्हे तर ते 12 आठवडे पहिल्या क्रमांकावर राहिलं आणि ‘सर्ताज गीत’ म्हणूनही त्याची नोंद झाली.

लोकप्रिय असूनही रेडिओवर बॅन

या गाण्याची लोकप्रियता वाढत असतानाच त्यावर वादही निर्माण झाला. गाण्यात नशा आणि ड्रग्सच्या संदर्भांची मांडणी असल्याने त्याचा तरुणांवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर ऑल इंडिया रेडिओवर हे गाणं काही काळ प्रसारित करण्यात आलं नाही. आशा भोसले यांनीही एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की ‘दम मारो दम’वर सरकारी पातळीवर बंदी घालण्यात आली होती आणि दूरदर्शनवर चित्रपट दाखवताना हे गाणं कट केलं जात असे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us