Ashwini Ekbote : एक गिरकी अन् आयुष्याची रंगमंचावरच ‘भैरवी’, स्टेजवरच मराठी अभिनेत्रीची मनाला चटका लावणारी एक्झिट
Ashwini Ekbote : मराठी अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं २२ ऑक्टोबर २०१६ रोजी वयाच्या 44व्या वर्षी अकाली निधन झालं. त्यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावून जाणारी होती.

मराठी चित्रपटसृष्टी, नाटक आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं निधन आजही अनेकांच्या मनाला चटका लावून जातं. अभिनयासोबतच शास्त्रीय नृत्यातही त्यांचं विशेष प्रभुत्व होतं. रंगमंचावर सादरीकरण करत असतानाच त्यांच्यावर काळानं घाला घातला आणि अवघ्या ४४ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वात शोककळा पसरली होती.
अखेरच्या क्षणापर्यंत कलेची साथ
२२ ऑक्टोबर २०१६ हा दिवस मराठी नाट्यसृष्टीसाठी अत्यंत दुःखद ठरला. पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे ‘नाट्यत्रिविधा’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अश्विनी एकबोटे सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमातील सादरीकरण सुरू असताना त्या नेहमीप्रमाणे आपल्या कलेत रमल्या होत्या. मात्र, त्याचवेळी एक अनपेक्षित घटना घडली.
कार्यक्रमाच्या अखेरच्या भागात नृत्य सादर करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नृत्य करताना त्या अचानक रंगमंचावर कोसळल्या. सुरुवातीला हा प्रसंग नाट्यप्रयोगाचाच एक भाग असावा, असं उपस्थितांना वाटलं. मात्र, काही क्षणांतच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं. त्यानंतर कार्यक्रम थांबवण्यात आला आणि त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं.
View this post on Instagram
वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
अश्विनी एकबोटे यांच्या अचानक जाण्यानं त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सहकलाकारांना मोठा धक्का बसला. त्या केवळ ४४ वर्षांच्या होत्या. अभिनय, नृत्य आणि रंगभूमी या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कलेप्रती असलेली निष्ठा यामुळे त्या अनेकांच्या आवडत्या अभिनेत्री बनल्या होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अनेक कलाकारांनी समाजमाध्यमांवर दुःख व्यक्त केलं. त्यांच्या सहकाऱ्यांसाठीही ही घटना स्वीकारणं कठीण होतं. प्रत्यक्ष रंगमंचावर घडलेली ही घटना अनेकांच्या मनात कायमची कोरली गेली.
चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य
अश्विनी एकबोटे यांनी मराठी मनोरंजनविश्वात विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. ‘देबू’, ‘महागुरू’, ‘बावरे प्रेम हे’, ‘तप्तपदी’, ‘डंक्यावर डंका’, ‘आरंभ’ आणि ‘कॉफी आणि बरंच काही’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. छोट्या पडद्यावरही त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. ‘दुहेरी’, ‘दुर्वा’, ‘राधा ही बावरी’, ‘तू भेटशी नव्याने’, ‘अहिल्याबाई होळकर’, ‘उंच माझा झोका’ आणि ‘असंभव’ यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.
रंगभूमीशी असलेले घट्ट नाते
चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत असतानाही अश्विनी एकबोटे यांचं रंगभूमीशी असलेलं नातं कायम होतं. ‘एका क्षणात’, ‘त्या तिघांची गोष्ट’ आणि ‘नांदी’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली होती.
