Atharva Sudame : मला माफी मागायची आहे…कुशल बद्रिकेच्या तक्रारीनंतर अथर्व सुदामेची जाहीर माफी, प्रकरण काय?
Atharva Sudame : कुशल बद्रिकेनं अथर्व सुदामेवर अपमान केल्याचा आरोप केला होता. यावर आता अथर्वनं प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी अभिनेता कुशल बद्रिके एका व्हिडिओमुळे चर्चेत आलेला. अभिनेत्यानं हा व्हिडिओ शेअर करत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेवर अपमान केल्याचा आरोप केला होता. सुदामेंनी सर्व कलाकारांना कांदेपोह्याच्या कार्यक्रमासाठी घरी बोलावलं, पण कांदेपोहे दिलेच नाही, अशी तक्रार कुशलनं केलेली. अशातच आता यावर अथर्व सुदामेनं प्रतिक्रिया दिली आहे.
अथर्व सुदामेची पोस्ट
अथर्व सुदामे इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हणाला की, ‘नमस्कार मित्रांनो, मी हा व्हिडिओ याकरिता बनवतोय की, मला माफी मागायची आहे. मी कलाकारांना घरी बोलावलं आणि त्यांना साधे कांदे–पोहेसुद्धा खायला घालू शकलो नाही. त्यामुळे कलाकार माझ्यावर चिडले, लोक पण माझ्यावर चिडले, मला म्हणाले, सुदामे हे काय बरोबर नाही, तुम्ही घरी बोलावता आणि साधे कांदे–पोहे खायला घालत नाहीत. त्याकरिता मी एक आयडिया केली आहे.’
‘मी ‘सुदाम्यांचे कांदे पोहे‘ हा कार्यक्रमच ठेवला आहे. फक्त कलाकारांसाठी नाही तर तुम्हा सगळ्यांसाठी हा कार्यक्रम मी ठेवलेला आहे. 9 नोव्हेंबरला पुण्यात, बालगंधर्व रंगमंदिरला हा कार्यक्रम होणार आहे, त्यासाठी तुम्हाला तिकीट काढावे लागतील.’ असं अथर्व शेवटी म्हणाला. अथर्वच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत कार्यक्रमाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
काय म्हणालेला कुशल बद्रिके?
कुशल बद्रिके म्हणालेला की, ‘‘नमस्कार, हा व्हिडिओ मी करतोय कारण इतक्या वर्षात मला कधी असा वाईट अनुभव आला नाही. पहिल्यांदाच असा एक अनुभव आला की, अथर्व सुदामे हा जो कंटेट क्रिएटर आहे, त्यानं सगळ्या कलाकारांना घरी बोलावलं आणि सांगितलं की, या सुदामेंकडे कांद्यापोह्यांचा कार्यक्रम आहे, आम्ही सगळे गेलो, पण एकालाही त्यानं काही कांदेपोहे दिले नाही…आम्ही सगळे हौशेनं गेलेलो की, चला सुदाम्यांचे कांदेपोहे खाऊयात…पण एकालाही कांदेपोहे मिळाले नाहीत.’
‘तू व्हिडिओवर अपमान करतोस, तिथपर्यंत ठिक आहे, पण बोलावून लोकांचा अपमान करतोयस, हे काही मला पटलेलं नाही, आणि माझा आक्षेप आहे या गोष्टीला अथर्व. बाकी कलाकार त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं रिअॅक्ट करतील, पण मला नाही आवडलंय हे सॉरी’ असं कुशलनं शेवटी म्हटलेलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कुशलनं पोस्ट डिलीट केली.
