Salman Khan : कतरिनाचं बॉडी शेमिंग करताच भाईजानचा उडाला भडका, पाकिस्तानी इन्फ्लुएन्सरने मागितली माफी
'बिग बॉस 20'च्या नुकत्याच झालेल्या भागात सलमान खान खूपच रागात दिसला. कतरिना कैफचं बॉडी शेमिंग करणाऱ्यांना त्याने चांगलंच सुनावलं. आता पाकिस्तानी इन्फ्लुएन्सरने कतरिनाची माफी मागितली आहे.

Salman Khan Bigg Boss 20 : लोप्रिय बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला तिच्या वाढलेल्या वजनामुळे, लूकमुळे खूप ट्रोल करण्यात आलं, तिचं बॉडी शेमिंग करण्यात आलं. पाकिस्तानमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि आरजे एजाज वारिसनेदेखील कतरिनाची खूप खिल्ली उडवल्याचं समोर आलं. मात्र कतरिना वर होणाऱ्या टीकेमुळे दबंग स्टार सलमान खान चांगलाच भडकला असून ‘बिग बॉस 20’च्या नुकत्याच पार पडलेल्या भागात त्याने ट्रोलर्सना चोख सुनावलं आणि कतरिनाची बाजू घेत तिला पाठिंबा दर्शवला. भाईजानचा भडका उडाल्याचं पाहून अनेकांचं धाबं दणाणलं. आता पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर एजाज वारिसनेही एका व्हिडीओद्वारे कतरिनाची माफ मागितली.
19 सप्टेंबर रोजी ‘बिग बॉस 20’ च्या ‘वीकेंड का वार’ या भागात सलमान प्रचंड संतापलेला दिसला. त्याने चित्रपट कलाकारांना ट्रोल करणाऱ्यांपासून ते पापाराझींपर्यंत सर्वांवरच कडक शब्दांत ताशेरे ओढले. यावेळी तिचं नाव न घेताही सलमानने कतरिनाची बाजूही सावरली. गरोदरपणात किंवा त्यानंतर प्रत्येकाचं वजन वाढतंच, ती सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत्ये आणि चित्रपटांमध्ये परतल्यावर ती पुन्हा फिट होईल, असं तो म्हणाला. त्याच्या या विधानानंतर आता कतरिनाच्या शरीरावरून तिची खिल्ली उडवणाऱ्या (बॉडी-शेमिंग करणाऱ्या) एजाज वारिस या पाकिस्तानी इन्फ्लुएन्सरने माफी मागितली आहे.
एजाजने जाहीर व्हिडीओतून मागितली माफी
यानंतर पाकिस्तानमधील इन्फ्लुएन्सर एजाज वारिस याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, “मी सलमान खानच्या ‘बिग बॉस’मधील एक क्लिप पाहत होतो, ज्यात त्याने माझा उल्लेख केला होता. ती क्लिप पाहिल्यानंतर मलाही असं वाटलं की, कतरिनाबद्दल मी त्या गोष्टी बोलायला नको होत्या. मी सलमान खान आणि कतरिना या दोघांचाही चाहता आहे. तरीही, रेकॉर्डिंगदरम्यान जरा भावनेच्या भरात मी त्या गोष्टी बोलून गेलो, हे मलाच कळलं नाही. माझ्या शब्दांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कतरिना कैफ, जर माझ्या शब्दांमुळे तुला वाईट वाटलं असेल, तर मी तुझी मनापासून माफी मागतो.” असं म्हणत त्याने माफी मागितली.
बॉडी शेमिंगचा हेतू नव्हता
मी ते अगदी कॅज्युअल अंदाजात बोललो होतो, बॉडी शेमिंगचा काही (माझा) उद्देश नव्हता. पण मी चुकीचं वागलो, याची मला जाणीव झाली आहे. म्हणून आता मी सलमान खान, कतरिना कैफ आणि प्रेक्षकांचीही माफी मागतो. माझ्या शब्दांमुळे कदाचित तुम्ही दुखावले गेले असाल, पण कोणाच्याही शरीरयष्टीवरून त्यांची थट्टा करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. त्यामुळे, मी याबद्दल माफी मागतो. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्या सर्वांची मी क्षमा मागतो.” अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.