भोंदू खरातची भूमिका किरीट सोमय्यांना मिळणार का? सुषमा अंधारेंनी डिवचले

भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांवरील चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात किरीट सोमय्या भोंदू खरातची भूमिका साकारणार का, असा सवाल ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी विचारून राजकीय चिमटा काढला आहे. यावर दिपाली सय्यद यांनी अंधारेंना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

भोंदू खरातची भूमिका किरीट सोमय्यांना मिळणार का? सुषमा अंधारेंनी डिवचले
sushma andhare
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 31, 2026 | 11:21 PM

लिंगपिसाट अशोक खरातच्या कारनाम्यांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. खरातच्या या कारनाम्यांची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. तो सध्या तुरुंगात असून त्याच्यावर कोर्टात खटले भरण्यात आले आहेत. खरातने महिलांचं लैंगिक शोषण करतानाच भोंदूगिरीच्या माध्यमातून करोडोची मायाही जमवली आहे. त्याच्या भक्त संप्रदायात सामान्य माणसंच नव्हे तर राजकारणी आणि सेलिब्रिटीही होते. त्याने या सर्व लोकांना गंडवल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या याच भोंदू खरातवर सिनेमा येणार आहे. या सिनेमात दिपाली सय्यद महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. तर इम्रान हाश्मीला खरातच्या भूमिकेसाठी विचारण्यात येणार आहे. ही चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना भोंदू खरातची भूमिका मिळणार का? अशा शब्दात डिवचले आहे.

सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. दिपाली सय्यद एखाद्या राजकीय पक्षात काम करण्याआधी कलाकार आहेत. आपल्याकडे अमोल कोल्हे कलाकार आहेत. कलाकारांची करिअर लाईन ठरली आहे. त्यामुळे दिपाली सय्यद यांनी कुठे काम करायचं हे स्वातंत्र्य त्यांना असलं पाहिजे. माझ्यासाठी उत्सुकता वेगळी आहे. चाकणकरांची भूमिका कोण करणार आहे? दिपाली सय्यद कुणाची भूमिका करत आहेत? हे यथावकाश स्पष्ट होईल. पण अशोक खरातची भूमिका नेमकं कोण करत आहे? कदाचित मुलुंडचे एचडी व्हिडीओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांना अशोक खरातची भूमिका मिळते का? हे बघणं जरा औत्सुक्याचं राहील, असा चिमटा सुषमा अंधारे यांनी काढला आहे.

धमक्या मिळणं चुकीचं

सिनेमात काम करतात म्हणून दिपाली सय्यद यांना धमक्या देणं चुकीचं आहे. त्याचा आम्ही निषेधच करतो. पण अशोक खरातची भूमिका किरीट सोमय्या करतील का हे पाहावे लागणार आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

त्यांची किव येते

दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या टीकेचा दिपाली सय्यद यांनी चांगलाच समाचार घेतला. मला सुषमा अंधारे यांची किव येते. महिला म्हणून त्यांनी असं वक्तव्य करणं हे त्यांना शोभत नाही, असा हल्ला करतानाच या सिनेमात सुषमा अंधारे यांचीही भूमिका असणार आहे. खरात प्रकरणात कुठे तरी भूमिका आहेच, असं उलट प्रत्युत्तर दिपाली सय्यद यांनी दिलं.

ऑक्टोबरमध्ये सिनेमा येणार?

दरम्यान, खरातवरील हा सिनेमा ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दिपाली सय्यद या सिनेमात रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार आहे. इतर कास्टिंग मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या सिनेमात आणखी कोण कोण काम करणार आहे, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या सिनेमाचा फोकस काय असणार आहे याचीही सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us