कोणालाच सोडणार नाही! जान्हवी कपूरसोबतचा AI व्हिडीओ व्हायरल होताच ज्युनियर एनटीआर संतापला, थेट म्हणाला…

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या मॉर्फ्ड व्हिडीओवर जूनियर एनटीआर संतापला. थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली कायदेशीर कारवाई करत असल्याची माहिती.

कोणालाच सोडणार नाही! जान्हवी कपूरसोबतचा AI व्हिडीओ व्हायरल होताच ज्युनियर एनटीआर संतापला, थेट म्हणाला...
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 03, 2026 | 6:54 PM

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआर यांची जोडी ‘देवरा: पार्ट 1’ या चित्रपटात पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसली होती. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. विशेष म्हणजे चित्रपटातील ‘चुट्टामल्ले’ हे गाणेही चांगलेच लोकप्रिय झाले होते. मात्र, आता याच गाण्याशी संबंधित एक मॉर्फ्ड आणि AI च्या मदतीने तयार करण्यात आलेला आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण चर्चेत आले आहे.

या व्हिडीओवर ज्युनियर एनटीआरने तीव्र नाराजी व्यक्त केली असून तो तयार करणाऱ्यांसह सोशल मीडियावर पसरवणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Loading...

AI च्या गैरवापरावर ज्युनियर एनटीआर संतप्त

शनिवारी ज्युनियर एनटीआरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या मॉर्फ्ड व्हिडीओचा निषेध केला. AI तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या महिलेला अशा अपमानास्पद पद्धतीने दाखवणे अत्यंत लज्जास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.

अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करून ऑनलाइन पसरवणाऱ्यांविरोधात शक्य ती सर्व कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आज एखाद्या दुसऱ्या महिलेसोबत असे घडत असेल तर उद्या हेच एखाद्याच्या आई, बहिणी, पत्नी किंवा मुलीसोबतही घडू शकते असे सांगत त्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले.

व्हिडीओ शेअर न करण्याचे आवाहन

ज्युनियर एनटीआरने केवळ व्हिडीओ तयार करणाऱ्यांवरच नाही तर तो सोशल मीडियावर पसरवणाऱ्यांवरही कारवाई करण्याची भूमिका मांडली आहे. तसेच अशा आक्षेपार्ह व्हिडीओला व्ह्यूज, शेअर किंवा कोणत्याही प्रकारचे एंगेजमेंट देऊ नये, असे आवाहन त्याने सोशल मीडिया यूजर्सना केले.

एआयच्या माध्यमातून तयार होणारे डीपफेक आणि मॉर्फ्ड कंटेंट सध्या मोठी चिंता बनत आहेत. सेलिब्रिटींचे फोटो किंवा व्हिडीओ बदलून ते चुकीच्या अथवा आक्षेपार्ह संदर्भात सादर करण्याच्या घटना समोर येत आहेत.

सरकारकडेही केली मागणी

ज्युनियर एनटीआरने हा प्रकार केवळ एका व्हिडीओपुरता मर्यादित नसून एआयच्या गैरवापराशी संबंधित व्यापक समस्या असल्याचे सांगितले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारे आणि भारत सरकारने कठोर नियम तसेच प्रभावी कारवाईची आवश्यकता आहे अशी मागणी त्याने केली.


आता या मॉर्फ्ड व्हिडीओच्या प्रकरणामुळे AI तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर, डीपफेक कंटेंट आणि सोशल मीडियावरील अशा आक्षेपार्ह सामग्रीविरोधातील कारवाई यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us