बॉलिवूडसाठी गायली फक्त 5 गाणी, पण एका रोमँटिक गाण्याने जिंकली लाखो मनं; 25 वर्षांनंतरही क्रेझ कायम
तमिळ भाषेत हिट ठरलं, हिंदीतही प्रचंड लोकप्रिय झालं हे रोमँटिक गाणं आजही संगीतप्रेमींच्या लक्षात आहे. बॉम्बे जयश्री यांच्या आवाजातील या गाण्याने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. या गाण्याशिवाय त्यांनी बॉलिवूडसाठी आतापर्यंत फक्त पाचच गाणी गायली आहेत.

काही बॉलिवूड सिनेमे हे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यांची सुंदरता त्यांचं कथानक आणि त्यातील अभिनेत्यांचा अभिनय याला कारणीभूत असतो, तर कधी त्या चित्रपटातील काही गाणीही त्यासाठी कारणीभूत असतात. असा प्रकार अनेक सिनेमांबाबत घडतो. तर काही सिनेमांना थेट बॉक्स ऑफिसवर तेवढी पसंती मिळत नाही जितकी छोट्या पडद्यावर मिळते किंवा आता सांगायचं झाल्यास मोबाईल आणि ओटीटीवर मिळतो. असाच एक सिनेमा होता रहना हैं तेरे दिल में. मॅडी आणि रीनाची प्रेमकथा प्रचंड हिट ठरलेली. या सिनेमाचं कथानक आणि अभिनेत्यांचा अभिनय आणि त्यातील गाणी आजही अनेकजण विसरु शकलेले नाहीत. अनेक प्रेक्षक मॅडी आणि रीनाचे ऑल टाईम फॅन आहेत. आज १९ ऑक्टोबर रोजी या सिनेमाला प्रदर्शित होऊन २५ वर्ष पूर्ण झाली आहेत.
दरम्यान, या सिनेमात अनेक गाणी आहेत. प्रत्येक गाणं हे प्रचंड सुंदर आणि ऐकल्यानंतर एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणार आहे. या सिनेमाचं अख्ख संगीतच अप्रतिम आहे. रहना है तेरे दिल में हे शीर्षक गीत असेल किंवा सच कह रहा हैं दिवाना हे गाणं असेल प्रत्येक गाणं लोकप्रिय आहे. याशिवाय चित्रपटामध्ये आणखी एक अतिशय सुंदर आणि रोमँटिक गाणं आहे. ज्याची जादू इतक्या वर्षांमध्ये अजिबात कमी होऊ शकली नाही. हे गाणं म्हणजे जरा जरा महकता है. मूळच्या कर्नाटकमधील प्रसिद्ध गायिका बॉम्बे जयश्री यांनी हे गाणं गायलं आहे. समीन अंजान यांनी या गीताचे बोल लिहिले आहेत. तर हरिश जयराज यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. गाणं खूप श्रवणीय असून खास बाब म्हणजे या गाण्याचं चित्रिकरण. अभिनेत्री दिया मिर्झा आणि आर. माधवन यांच्यावर चित्रित केलेल्या गाण्याला तोडच नाही.
पण अनेकांना माहिती नाही की, हे गाणं तमिळ गाण्याचे रिमेक होते. मिनाले हा तमिळ सिनेमा पूर्णपणे हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला होता. त्यातूनच हे गाणेही हिंदीतही परत तयार करण्यात आले. तमिळमध्ये बॉम्बे जयश्री यांनी गायलेलं गाणं हिंदीतही त्यांच्याच आवाजात रेकॉर्ड झालं आणि ते अजरामर झालं.
दरम्यान, बॉम्बे जयश्री यांच्या हिंदी गाण्यांबद्दल बोलायचे तर त्यांनी फक्त पाच गाणी गायली आहेत. ज्यामध्ये जरा जरा (रहना है तेरे दिल में), खुल के मुस्कुराले (फिर मिलेंगे), प्यार होता (द स्मार्ट हंट), चाहूं भी तो (फोर्स), ममता से भारी (बाहुबली 1), स्वपन सुनहरे (बाहुबली 1) ही गाणी आहेत.