Daler Mehndi : ‘ते कोणत्या नशेत होते, सांगू शकत नाही’; दलेर मेहंदींच्या कार्यक्रमावर मंत्र्यांचं वक्तव्य
आपल्या पंजाबी गाण्यावर सर्वांना थिरकायला लावणारे गायक 'दलेर मेहंदी' सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. उत्तराखंडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांच्या गाण्यावरून वाद झाला.जाणून घ्या सविस्तर

‘तुनक तुनक तुन’, बोलो ता रा रा’ यांसारख्या गाण्यांनी प्रेक्षकांना थिरकायला लावणारे गायक ‘दलेर मेहंदी’ सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. उत्तराखंडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांच्या गाण्यावरून वाद झाला. त्यानंतर राज्याचे मंत्री सुबोध उनियाल यांनी याप्रकरणी प्रश्न उपस्थित केले. यावर बोलताना त्यांनी बॉलिवूडमधील काही कलाकार दलेर यांना सपोर्ट करत आहेत असं म्हणत बॉलिवूडवरही टिका केली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
उत्तराखंडमधील नरेंद्रनगर येथे आयोजित मा कुजांपुरी मेळ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमात दलेर मेहंदी यांचा कार्यक्रम संपन्न झाला. पण वाद रंगला तो त्यांच्या गाण्यावरून, ते प्रत्यक्ष गात आहेत की, रेकॉर्ड केलेल्या गाण्यावर केवळ ओठांची हालचाल करत आहेत, अशी शंका लोकांना येऊ लागली. त्यामुळे त्यांच्या सादरीकरणावर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली. त्यानंतर मंत्री सुबोध उनियाल यांनीही मंचावर जाऊन आक्षेप घेतला.
उनियाल हे स्थानिक आमदार असून मेळा समितीचे अध्यक्षही आहेत. उनियाल यांनी सांगितले की, लोक दलेर यांना ऐकण्यासाठी आले होते. त्यांच्या टीमला नाही. असं वाटतं होतं की, पूर्ण सिस्टिम ऑटोमॅटिक मोडवर चालत होते. सर्व लोक लिप्सिंग करत होते. त्यावेळी मी त्यांना म्हणालोही होतो ‘हे असे चालणार नाही’ एवढं मोठं नाव असलेल्या कलाकाराने स्वत: गाऊन आपल्या नावाची प्रतिष्ठा राखायला हवी होती.
ते लोक कोणत्या नशेत होते, हे मी सांगू शकत नाही
‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत सुबोध उनियाल यांनी दलेर यांच्या प्रकृतीबाबत आणि सादरीकरणाबाबतही आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, ‘मंचावर दलेर धड नीट बोलू शकत नव्हते, धड चालू शकत नव्हते. संपूर्ण जगाने त्यांचा तो व्हिडिओ पाहिला आहे. मला वाटले की ते ड्रग्जच्या प्रभावाखाली होते. आता तो ड्रग कोणता होता? मी एवढ्या मोठ्या कलाकाराची तपासणी करत नाही. त्यामुळे दलेर त्यावेळी कशाच्या प्रभावाखाली होते, हे मी सांगू शकत नाही.’
दलेर मेहंदी यांची तब्बेत खराब होती, असं नंतर आम्हाला सांगण्यात आलं. पण इतक्या मोठ्या कलाकाराची तब्बेत ठीक नव्हती, तर त्यांनी कार्यक्रमाला येऊ नये किंवा आयोजकांना आधीच कळवायला हवं होतं. असंही उनियाल यांनी सांगितले.
उनियाल यांच्या म्हणण्यांनुसार कार्यक्रमासाठी दलेर यांना 35 लाख रूपये देण्यात आले होते. त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षेनुसार सादरीकरण व्हावं अशी आयोजकांची अपेक्षा होती. जेव्हा मला हे कळलं तेव्हा मला एक प्रतिनिधी म्हणून मंचावर जावे लागले. कलाकारांचा आम्ही आदर राखण्यासाठी कलाकारांनी सुद्धा त्यांच्या नावानुसार आणि कामानुसार सादरीकरण केले पाहिजे. असे उनियाल यांनी स्पष्ट केले.
बॉलिवूडच्या पाठिंब्यावर काय म्हणाले मंत्री ?
या वादानंतर अभिनेता अनुपम खेर,गायक मीका सिंह आणि इतर कलाकारांवी दलेर मेहंदी यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. दलेर यांची प्रकृती ठीक नसल्याची आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिली आहे.पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री उनियाल म्हणाले की, ‘मी कोणतीही अपमानास्पद भाषा वापरली नाही किंवा त्यांना दुखावण्याचा माझा हेतूही नव्हता. ते एक मोठे नाव आहे, म्हणून मी त्यांना आमंत्रित केले होते. जर बॉलिवूडमधील कलाकार दलेर यांच्या बाजूने बोलत असतील तर ते त्यांचे मित्र आहेत त्यांना दलेर यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे पाठिंबा द्यायचा असेल.’
