कुणाची ताकद मोठी ते बघुयात, रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी; दिपाली सय्यद संतापल्या
'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. रुपाली चाकणकर यांच्यामुळे सेन्सॉर बोर्डाला खूप त्रास होत असल्याचा आरोप अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी केला आहे.

रुपाली चाकणकर यांच्या ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनवरून सध्या चर्चा सुरू आहे. याच मुद्द्यावर अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. रुपाली चाकणकर यांच्यामुळे सेन्सॉर बोर्डाला त्रास होत असल्याचा आरोप करत, महिलांचं शोषण करणाऱ्या व्यक्तीविरोधात चित्रपट तयार केला जात असेल, तर त्याला पाठिंबा मिळायला हवा, असं त्या म्हणाल्या. चित्रपटाला विरोध करण्याऐवजी प्रेक्षकांनी आधी तो पाहावा आणि मग आपलं मत मांडावं, असं आवाहनही त्यांनी केलं. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी चित्रपटावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून महिलांचं शोषण आणि भोंदूगिरीसारख्या विषयांवर भाष्य करण्यात येणार असल्याचं दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी सांगितलं आहे. दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या नावाचा, फोटोचा आणि वैयक्तिक शैलीचा परवानगीशिवाय वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दिपाली सय्यद म्हणाल्या, “मी या गोष्टीकडे असं बघते की, आपण असं काय चुकीचं करतोय? महिलांचं शोषण करणाऱ्या व्यक्तीविरोधात जर आपण चित्रपट बनवतोय, तर त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायला हवा. त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. त्यावेळी जर त्यांनी असा हंगामा केला असता, तर अनेक महिलांचं शोषण थांबलं असतं.” चाकणकर यांच्यामुळे सेन्सॉर बोर्डाला प्रचंड त्रास होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुढे त्या म्हणाल्या की, सेन्सॉर बोर्डाकडे जाऊन चित्रपटाला विरोध केला जात असल्याचं आम्हाला सांगितलं जात आहे. ‘तुम्ही चित्रपट आणू नका’, असंही आम्हाला सांगितलं जातंय. सेन्सॉरला ‘कुणाची ताकद मोठी ते बघुयात’, असं सांगितलं जात असल्याचा दावाही दिपाली यांनी केला. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रक्रियेत अडथळे येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
‘महाराष्ट्रात करोडोंनी महिला साड्या नेसतात, मग…’
रुपाली चाकणकर यांच्या ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनच्या मुद्द्यावर बोलताना दिपाली सय्यद यांनी साडी आणि नावाच्या ट्रेडमार्कवरही प्रश्न उपस्थित केले. “साड्यांवर ट्रेडमार्क करणं, म्हणजे आपण साड्या नेसायच्या नाही का? महाराष्ट्रात करोडोंनी महिला साड्या नेसतात. कितीतरी मुलींची नावं रुपाली आहेत. मग हे असं कसलं ट्रेडमार्क असतं?” असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणात अनेक संस्था विरोध करत असल्याचंही त्या म्हणाल्या.
एखादी वाईट घटना घडल्यानंतर भविष्यात अशा घटना घडू नयेत, लोकांची फसवणूक होऊ नये, यासाठी काही प्रयत्न केले जातात. मात्र, अशा वेळी अनेक अडथळे निर्माण होतात. तरीही चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास दिपाली यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील जनता अशा गोष्टी थांबवणार नाही, असंही त्या म्हणाल्या.
“मी या महाराष्ट्रात राहते. या महाराष्ट्राने मला खूप काही दिलंय. मग या जन्मभूमीवर आणि कर्मभूमीवर आपण चुकीच्या गोष्टी कशा खपवून घेणार?” असं म्हणत त्यांनी चित्रपटाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. तसेच, प्रेक्षकांनी आधी चित्रपट पाहावा आणि त्यानंतर त्यावर बोलावं किंवा विरोध करावा, असंही त्या म्हणाल्या. आता दिपाली सय्यद यांच्या या वक्तव्यावर रुपाली चाकणकर काय प्रतिक्रिया देतात, याकडे लक्ष लागलं आहे.