
रणवीर सिंहचा ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अगदी पहिल्या दिवसापासून हा स्पाय थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवे विक्रम रचतोय. पहिल्या आठवड्याच्या छप्परफाड कमाईनंतर आता दुसऱ्या वीकेंडलाही ‘धुरंधर 2’ने दमदार कामगिरी केली. या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्याने सर्वांनाच चकीत केलं आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षातील सर्वांत मोठा बॉक्स ऑफिस सेन्सेशन बनला आहे. विशेषकरून वीकेंडला थिएटर्स हाऊसफुल होत आहेत. ‘धुरंधर 2’ने प्रदर्शनाच्या 11 दिवसांत जबरदस्त कमाई करत मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
‘धुरंधर 2’ने पहिल्या आठवड्यात 674.17 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यानंतर नवव्या दिवसाची कमाई 41.75 कोटी रुपयांवर पोहोचली होती. तर दहाव्या दिवशी या चित्रपटाने 62.85 कोटी रुपये कमावले. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार अकराव्या दिवशी म्हणजेच प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी रणवीरच्या या चित्रपटाने तब्बल 68.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे गेल्या 11 दिवसांत या चित्रपटाची एकूण कमाई 846.87 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर भारतात त्याचं ग्रॉस कलेक्शन 1011.95 कोटी रुपये इतकं आहे.
‘धुरंधर 2’ने प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशी फक्त ‘धुरंधर’च्या दुसऱ्या वीकेंडचं 141.5 कोटींचं कलेक्शन मागे टाकलं नाही, तर अवघ्या 11 दिवसांत त्याच्या पहिल्या भागाच्या 840.20 कोटी रुपये या लाइफटाइम कलेक्शनलाही मात दिली आहे. आदित्य धरच्या या चित्रपटाने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द राइज’च्या 812.14 कोटींच्या हिंदीतील कलेक्शनलाही मागे टाकलं आहे. ‘धुरंधर : द रिव्हेंज’ने ब्लॉकबस्टर म्हणून आपलं स्थान आणखी पक्कं केलं आहे.
‘धुरंधर 2’ने तब्बल 68.10 कोटी रुपयांची कमाई करत अकराव्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याचा मान मिळवला आहे. आतापर्यंत अकराव्या दिवशी सर्वाधिक कमाईचा विक्रम ‘पुष्पा 2’च्या नावावर होता, ज्याने 54 कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटात रणवीरसोबतच अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, राकेश बेदी, सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत. भारतातील गुप्तहेर पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या, गँगस्टरच्या गटात सामील होऊन कशा प्रकारे हेरगिरी करतो आणि त्यांचा खात्मा करतो, याचा थरार ‘धुरंधर’मध्ये पहायला मिळतो. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. भारतावरील दहशतवादी हल्ले, पाकिस्तानच्या ल्यारीमधील गँगवॉर.. यांचा संदर्भ त्यात पहायला मिळतो.