‘धुरंधर 2’ने रचला इतिहास, शाहरुखच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला, कमाई पाहून…

'धुरंधर 2' चित्रपटाने शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला. आठ दिवसांची कमाई पाहून दिग्गज कलाकार थक्क.

धुरंधर 2ने रचला इतिहास, शाहरुखच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला, कमाई पाहून...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 27, 2026 | 2:01 PM

रणवीर सिंहचा ‘धुरंधर 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. देशासह जगभरात हा चित्रपट कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय-थ्रिलर चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकत जबरदस्त यश मिळवलं आहे.

‘धुरंधर 2’ ने काही दिवसांमध्ये सर्वात वेगवान पद्धतीने 1000 कोटींचा टप्पा पार केला पण त्यासोबतच त्याने अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकत आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. वर्किंग डेजमध्येही या चित्रपटाची कमाई थांबण्याचं नाव घेत नाहीये. दुसऱ्या गुरुवारीही चित्रपटाने दमदार कमाई करत आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे.

Sacnilk च्या अहवालानुसार, गुरुवारी प्राथमिक आकडेवारीनुसार या चित्रपटाने भारतात 19,493 शोमधून तब्बल 49.70 कोटींची कमाई केली. यामुळे देशांतर्गत ग्रॉस कलेक्शन 805.32 कोटींवर पोहोचले असून नेट कलेक्शन 674.17 कोटी इतके झाले आहे. परदेशातील 261.92 कोटींच्या कमाईसह एकूण वर्ल्डवाइड कलेक्शन 1,067.24 कोटींवर पोहोचले होते. गुरुवारी परदेशातून झालेल्या कमाईची भर घातल्यानंतर या चित्रपटाने 1,100 कोटींचा टप्पाही यशस्वीरित्या ओलांडला आहे.

‘पठाण’ला दिली टक्कर

विशेष म्हणजे, ‘धुरंधर 2’ने रिलीजच्या आठव्या दिवशीच शाहरुख खानच्या पठाण या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कलेक्शन 1069.85 कोटीला मागे टाकले आहे. ही कामगिरी अतिशय वेगाने साध्य झाल्याने उद्योगात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आता या चित्रपटाचं पुढचं लक्ष्य जवान या चित्रपटाच्या 1163.62 कोटींच्या वर्ल्डवाइड कलेक्शनवर आहे. सध्याच्या वेगाने कमाई सुरू राहिल्यास, दुसऱ्या शुक्रवारपर्यंत हा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास ‘धुरंधर 2’ हा जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो.

‘दंगल’ अजूनही अव्वल

दरम्यान, सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये आमिर खानचा दंगल हा चित्रपट 2,059 कोटींच्या कमाईसह अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ‘धुरंधर 2’ ला या विक्रमापर्यंत पोहोचण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठावा लागणार असला तरी सध्याचा वेग पाहता हा चित्रपट अनेक विक्रम मोडण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

Follow Us