‘धुरंधर 2’ फेम राकेश बेदींच्या त्या एका शब्दावरून वाद; तुरुंगात जाण्याच्या भीतीने अखेर मागितली माफी
'धुरंधर'मध्ये जमील जमालीची भूमिका साकारून प्रेक्षकांकडून प्रचंड प्रशंसा मिळवणारे अभिनेते राकेश बेदी सध्या एका व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अखेर तुरुंगात जाण्याच्या भीतीमुळे त्यांनी जाहीर माफी मागितली आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटांमध्ये जमील जमालीची भूमिका साकारलेले अभिनेते राकेश बेदी एका व्हिडीओमुळे वादात सापडले आहेत. राकेश बेदी यांचा एक जुना व्हिडीओ सध्या चर्चेत आला असून त्यामध्ये त्यांनी उच्चारलेल्या एका शब्दावरून हा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडीओ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना दिसत आहेत. परंतु त्याविषयी बोलताना त्यांनी चुकून ‘हरिजन’ हा शब्द उच्चारला होता. राकेश बेदी यांचा हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत असून त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली. अखेर त्यांनी याप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. मी चांगल्या हेतूनेच तो शब्द उच्चारला होता, परंतु भारतात त्या शब्दाच्या वापरावर अधिकृतरित्या बंदी असल्याची माहिती मला नव्हती, असं म्हणत राकेश बेदी यांनी माफी मागितली आहे.
आझाद समाज पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष कैलाश जैस्वार यांनी राकेश बेदी यांचा हा व्हिडीओ ऑनलाइन शेअर केल्यावर हे प्रकरण चर्चेत आलं. या क्लिपमध्ये डॉ. आंबेडकरांनी वंचित समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल बोलताना राकेश बेदी ‘हरिजन’ हा शब्द वापरताना ऐकू येतात. भारतात या शब्दाच्या अधिकृत वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राकेश बेदी यांनी तो शब्द उच्चारल्यामुळे कैलाश जैस्वार यांनी त्यांच्यावर टीका केली. त्याचप्रमाणे त्यांनी स्वत: राकेश बेदी यांच्याशी बोलून त्यांना जाहीरपणे माफी मागण्यास सांगितलं.
कैलाश जैसवार ने फिल्म अभिनेता व धुरंधर फिल्म के जमील जमाली “राकेश बेदी” से माफी मंगवाईं. अभिनेता द्वारा दिए गए आपत्तिजनक बयान – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी ‘हरिजनों’ के लिए लड़ाई लड़ते रहे, इस बयान पर मैंने राकेश बेदी से विडियो संदेश के जरिए माफी मंगवाईं।@AzadSamajParty मुंबई pic.twitter.com/obxYiB92ql
— Kailash Jaiswar (@kailashJai_ASP) April 5, 2026
हा वाद वाढल्यानंतर राकेश बेदी यांनी लगेच माफी मागतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, “नमस्कार मित्रांनो.. मी राकेश बेदी आहे. काही महिन्यांपूर्वी मी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये मी म्हटलं होतं की भीमराव आंबेडकरांनी आपल्या देशातील दलित, हरिजन आणि मागासलेल्या समाजातील लोकांसाठी खूप काम केलंय. त्यांनी त्यांच्या उन्नतीसाठी खूप मेहनत घेतली. परंतु आता मला कळलं आहे की आपल्या देशात ‘हरिजन’ या शब्दाच्या वापरावर बंदी आहे. मी हे चांगल्या हेतूनेच म्हटलं होतं. कारण त्यांनी हरिजन आणि दलितांसाठी खूप मेहनत घेतली होती. पण माझ्याकडून हरिजन या शब्दाच्या वापरामुळे जर कुठल्याही व्यक्तीच्या किंवा समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो. मी तो शब्द हेतुपुरस्सर वापरला नव्हता. तो शब्द प्रतिबंधित आहे हे मला माहीत नव्हतं.”
कैलाश जैस्वार यांनी एक व्हॉइस नोट शेअर केली होती. या व्हॉइस नोटमध्ये ते राकेश बेदी यांच्याशी फोनवर बोलत असल्याचं ऐकू येत होतं. आजच्या काळात हरिजन हा शब्द अयोग्य का मानला जातो, हे त्यांनी राकेश यांना समजावून सांगितलं आणि सार्वजनिकरित्या माफी मागण्याची विनंती केली.