‘धुरंधर 2’मध्ये ‘बडे साहब’ कोण? अखेर पडदा उघडला; या अभिनेत्याचे नाव समोर येताच…

आदित्य धरच्या ‘धुरंधर 2’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'बडे साहब' कोण याची चर्चा सुरू असताना, इमरान हाशमी या भूमिकेत असल्याचा व्हायरल दावा फेटाळण्यात आला आहे. व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये सत्यता नाही कारण ती संपादनयोग्य वेबसाइट होती. निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा बाकी आहे. यात यामी गौतम धरच्या समावेशाचीही चर्चा आहे.

‘धुरंधर 2’मध्ये ‘बडे साहब’ कोण? अखेर पडदा उघडला; या अभिनेत्याचे नाव समोर येताच...
Dhurandhar-Feature
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 24, 2026 | 7:27 PM

आदित्य धरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘धुरंधर’ चित्रपट आता पार्ट टूमुळे अधिक चर्चेत आहे. पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा सिनेमा हिंदीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. आता ‘धुरंधर 2’च्या रिलीजपूर्वीही चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. पहिल्या भागात एका रहस्यमय पात्राचा उल्लेख करण्यात आला होता तो म्हणजे ‘बडे साहेब’. मात्र हे ‘बडे साहेब’ नेमके कोण आहेत? आणि ही भूमिका कोणता अभिनेता साकारत आहे? याबाबत निर्मात्यांनी सस्पेन्स ठेवला आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला की ‘धुरंधर’मधील ‘बडे साहेब’ ही भूमिका दुसरे कोणी नसून इमरान हाशमी साकारणार आहेत.

‘धुरंधर 2’च्या कलाकारांबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्याचा एक स्क्रीनशॉट सध्या जोरात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इमरान हाशमी यांचे नावही दिसत आहे. त्यामुळे ‘बडे साहेब’ ही भूमिका इमरान हाशमी साकारणार असल्याचा अनेकांचा दावा आहे. मात्र या दाव्यात काही ठोस तथ्य दिसत नाही. कारण ज्या वेबसाइटचा स्क्रीनशॉट व्हायरल केला जात आहे, ती कोणीही यूजर एडिट करू शकतो. हा एक सार्वजनिक प्लॅटफॉर्म असल्याने कोणताही फॅन आपल्या मर्जीनुसार त्यात बदल करू शकतो. त्यामुळे या सिनेमातील बडे साहेबचं गूढ अधिकच वाढलं गेलं आहे.

दावा नाही, पण…

व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये खालील ओळींमध्ये इमरान हाशमीचे नाव दिसत होते. मात्र संबंधित वेबसाइटवर जाऊन तपास केला असता तिथे त्यांचे नाव आढळले नाही. त्यामुळे दोन शक्यता समोर येतात. एक म्हणजे कदाचित कुणीतरी पुन्हा एडिट करून त्यांचे नाव काढले असेल, किंवा एखाद्या खोडकर फॅन पेजचा स्क्रीनशॉट बदलून त्यात त्यांचे नाव टाकले गेले असेल. एकूणात, इमरान हाशमी यांच्या भूमिकेबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच ज्या पेजच्या आधारे त्यांच्या सहभागाचा दावा केला जात होता, त्या पेजवरूनही आता त्यांचे नाव हटवण्यात आले आहे.

यामी गौतमचे नावही यादीत

लेटरबॉक्स्डवरील कास्ट सेक्शनमध्ये ‘धुरंधर: द रिवेंज’च्या कलाकारांची जी माहिती दिसते, त्यामध्ये रणवीर सिंह, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी, दानिश पंडोर आणि गौरव गेरा यांसारख्या अनेक कलाकारांची नावे समाविष्ट आहेत.

यामी दिसणार?

याच यादीत दिग्दर्शक आदित्य धर यांची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतम धरचे नावही दिसत आहे. काही वृत्तांमध्ये आधीच दावा करण्यात आलाय की, यामी ‘धुरंधर 2’चा भाग असेल. मात्र, तिच्या सहभागाबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हा चित्रपट 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.