वडिलांनंतर आता पत्नी दीपिकासुद्धा रुग्णालयात; पुन्हा होणार सर्जरी? शोएबने दिले अपडेट्स

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करच्या पोटात पुन्हा दोन नवे सिस्ट आढळल्याने चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तिच्यावर पुन्हा सर्जरी होणार का, असा प्रश्न अनेकांनी विचारला. त्यावर आता पती शोएबने उत्तर दिलं आहे.

वडिलांनंतर आता पत्नी दीपिकासुद्धा रुग्णालयात; पुन्हा होणार सर्जरी? शोएबने दिले अपडेट्स
Shoaib Ibrahim and Dipika Kakar
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 08, 2026 | 1:40 PM

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही काळापासून आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करत आहे. लिव्हर कॅन्सरवर मात केल्यानंतर दीपिकाच्या पोटात सिस्ट आढळले होते. त्यावर सर्जरी झाल्यानंतर पुन्हा चाचणीदरम्यान दोन नवीन सिस्ट (गाठ) आढळल्याची माहिती तिने चाहत्यांना दिली. तेव्हापासून चाहते तिच्या आरोग्याविषयी काळजी व्यक्त करत आहेत. आता दीपिकाचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिम याने युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करत तिच्या आरोग्याविषयीचे अपडेट्स दिले आहेत.

सोशल मीडियावर दीपिकाची पुन्हा सर्जरी होणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र शोएबने या चर्चा फेटाळल्या आहेत. मात्र दीपिका लवकरच इम्युनोथेरपी सुरू करणार असल्याची माहिती त्याने दिली आहे. शोएबने त्याच्या युट्यूब चॅनलवर नवीन व्लॉग पोस्ट केला आहे. या व्लॉगमध्ये त्याने दीपिकाच्या रिकव्हरीसंदर्भात बरंच काही चाहत्यांना सांगितलं आहे. दीपिकाच्या इम्युनोथेरपीचा पहिला सेशन सुरू झाल्याचं त्याने सांगितलं आहे. “दीपिकाची इम्युनोथेरपी एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये सुरू झाली आहे. त्यासाठी तीन ते चार तास लागतात. त्यानंतर मी वडिलांना भेटायला कोकिलाबेन रुग्णालयात जाणार आहे. इम्युनोथेरपीचा दीपिकावर चांगला परिणाम होईल, अशी मला आशा आहे”, असं शोएब म्हणाला.

दीपिकाची आणखी एक सर्जरी होणार नसल्याचं स्पष्ट करत त्याने पुढे सांगितलं, “अनेकजण विचारत आहेत की दीपिकाची पुन्हा सर्जरी होणार का? त्यावर अद्याप डॉक्टरांनी काहीच सांगितलं नाही. सध्या तरी कोणतीही सर्जरी होणार नाही.” एकीकडे दीपिकाची इम्युनोथेरपी सुरू झाली असतानाच दुसरीकडे शोएबला त्याच्या वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागत आहे. मे महिन्यात त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

वडिलांची प्रकृती आधीपेक्षा खूप बरी असल्याची माहिती शोएबने चाहत्यांना दिली आहे. “जवळपास दहा दिवसांनंतर वडिलांनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली आहे. थोडफार अडखळत आहे, पण बोलत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत त्यांची प्रकृती सुधारली आहे,” असं शोएब म्हणाला. 2025 मध्ये दीपिकाला स्टेज 2 च्या लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिच्यावर सर्जरी करण्यात आली होती. आपल्या युट्यूब चॅनलवर व्लॉग पोस्ट करत ती तिच्या आरोग्याविषयीचे प्रत्येक अपडेट्स चाहत्यांना देत असते.

Follow Us