अशा परिस्थितीत मला कोण काम देणार? दीपिकाने मांडली व्यथा, उपचारांमुळे अशी अवस्था

Dipika Kakar: अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही काळापासून आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत मला कोण काम देणार, असा सवाल तिने केला आहे. दीपिका नेमकं काय म्हणाली, ते जाणून घ्या..

अशा परिस्थितीत मला कोण काम देणार? दीपिकाने मांडली व्यथा, उपचारांमुळे अशी अवस्था
दीपिका कक्कर
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 22, 2026 | 12:05 PM

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच कामाच्या आघाडीवरही मोठा बदल अनुभवत आहे. कॅन्सरवरील उपचार सुरू असल्यामुळे रोजच्या मालिकेतील कामाचं व्यस्त वेळापत्रक सांभाळणं सध्या शक्य होणार नसल्याचं दीपिकाने स्पष्ट केलं आहे. नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये तिने तिच्या कामाच्या प्लॅन्सबाबत मनमोकळेपणाने भाष्य केलं. दीपिका सध्या पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमसोबत एका म्युझिक व्हिडीओच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र हा प्रोजेक्ट स्वीकारताना तिने आपल्या सध्याच्या परिस्थितीचा विचार केला. डेली सोपसाठी (दैनंदिन मालिका) दररोज अनेक तास शूटिंग करावं लागतं आणि त्यासाठी सातत्याने सेटवर उपस्थित राहणं आवश्यक असतं. उपचार आणि त्याचे होणारे परिणाम लक्षात घेता सध्या अशा प्रकारचं काम करणं तिच्यासाठी कठीण असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं.

“मला कोण कास्ट करेल?”

दीपिकाने तिच्या व्लॉगमध्ये अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितलं की, सध्याची परिस्थिती पाहता तिला डेली सोप करता येईल असं वाटत नाही. त्यानंतर तिने स्वतःच प्रश्न केला की, ‘अशा उपचारांमध्ये मला कोणी कास्ट का करेल?’ उपचार सुरू असताना त्याचे साइड इफेक्ट्स होणं स्वाभाविक असल्याचंही तिने म्हटलं. त्यामुळे याबाबत फार विचार करून निराश होण्याची गरज नसल्याचं दीपिका म्हणाली.

सध्या दीर्घकाळ चालणाऱ्या प्रोजेक्टपेक्षा कमी दिवसांचं किंवा एका दिवसात पूर्ण होणारं काम तिच्यासाठी अधिक सोयीचं असल्याचं दीपिकाने सांगितलं आहे. त्यामुळेच तिने शोएबसोबत म्युझिक व्हिडीओ करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रोजेक्टसाठी रिहर्सलही सुरू झाली असून, त्यात हलकंफुलकं डान्स परफॉर्मन्स असणार असल्याचं तिने सांगितलं.

दीपिका गेल्या काही काळापासून तिच्या उपचारांबाबत चाहत्यांना व्लॉगच्या माध्यमातून अपडेट देत आहे. 2025 मध्ये तिने लिव्हरमधील ट्यूमरबाबत माहिती दिली होती आणि त्यानंतर शस्त्रक्रियाही झाली. पुढील उपचारांदरम्यान तिला विविध शारीरिक अडचणी आणि साइड इफेक्ट्सचा सामना करावा लागला. 2026 मध्ये तिच्या पोटात सिस्ट आढळल्याची माहितीही समोर आली होती.

या सगळ्या परिस्थितीतही दीपिकाने कामाशी पूर्णपणे नातं तोडलेलं नाही. डेली सोपचा मोठा कमिटमेंट असलेला फॉरमॅट सध्या टाळत असली, तरी छोट्या प्रोजेक्टच्या माध्यमातून कॅमेऱ्यासमोर परतण्याचा प्रयत्न ती करत आहे. दीपिकाने यापूर्वी ‘ससुराल सिमर का’, ‘कहां हम कहां तुम’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. 2025 मध्ये ती ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्येही सहभागी झाली होती; मात्र प्रकृतीच्या कारणामुळे तिला हा शो मध्येच सोडावा लागला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us