Drishyam 3 Climax: ‘दृश्यम 3’चा क्लायमॅक्स सांग.. कलाकार, मित्रांकडूनच लाच देण्याचा प्रयत्न; लेखकाचा मोठा खुलासा

Drishyam 3 Climax: अजय देवगणचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'दृश्यम 3' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. यादरम्यान पटकथालेखक आमिर कियान खानने क्लायमॅक्सविषयी मोठा खुलासा केला आहे.

Drishyam 3 Climax: दृश्यम 3चा क्लायमॅक्स सांग.. कलाकार, मित्रांकडूनच लाच देण्याचा प्रयत्न; लेखकाचा मोठा खुलासा
दृश्यम 3
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 06, 2026 | 10:24 AM

Drishyam 3 Climax: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3: द कन्क्लूजन’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटातील रहस्य, ट्विस्ट आणि क्लायमॅक्स प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतानाच या चित्रपटाच्या लेखनामागे किती मोठी मेहनत घेण्यात आली, याचा खुलासा पटकथालेखक आमिल कियान खान यांनी केला आहे. चित्रपटाचा शेवट निश्चित करण्यासाठी तब्बल 100 पेक्षा जास्त ड्राफ्ट लिहिण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ‘दृश्यम’सारख्या लोकप्रिय फ्रँचायझीचा तिसरा भाग लिहिणं हे मोठं आव्हान असल्याचं आमिल यांनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्क्रिप्टच्या अनेक आवृत्त्या तयार करण्यात आल्या. इतके ड्राफ्ट झाले की त्यांची नेमकी संख्या स्वतः लेखकही विसरले. त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये ‘फायनल’, ‘फायनल 2’ अशा नावांनी अनेक फाइल्स तयार होत गेल्या.

‘दृश्यम’च्या पहिल्या दोन भागांमध्ये विजय साळगावकरच्या कुटुंबाची कथा आणि त्याच्या हुशारीने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे तिसऱ्या भागात प्रेक्षकांना पुन्हा आश्चर्यचकित करणं हे लेखकांसमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं. पहिल्या चित्रपटात विजय साळगावकर हा प्रेक्षकांसाठी जवळपास कोरं पात्र होतं. मात्र आता प्रेक्षकांना त्याची विचार करण्याची पद्धत, त्याच्या युक्त्या आणि संकटातून बाहेर पडण्याची शैली माहिती आहे. त्यामुळे तिसऱ्या भागासाठी कथा लिहिताना प्रत्येक प्रसंग अधिक बारकाईने विचारात घ्यावा लागला, असं आमिल यांनी सांगितलं. याशिवाय आधीच्या चित्रपटांची ओळख कायम ठेवतानाच तिसऱ्या भागाची कथा स्वतंत्र आणि नवीन ठेवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होतं. कथेमध्ये रहस्य आणि थरारासोबतच कुटुंब, भावना, विनोद आणि ड्रामा यांचा योग्य समतोल साधणंही आवश्यक होतं.

Loading...

क्लायमॅक्सची माहिती सर्वांपासून लपवली

‘दृश्यम 3’चा शेवट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी लीक होऊ नये, यासाठी निर्मात्यांनीही विशेष काळजी घेतली. चित्रपटाचा क्लायमॅक्स संपूर्ण टीमला सांगण्यात आला नव्हता. गरजेनुसार म्हणजेच ‘नीड-टू-नो’ पद्धतीनेच संबंधित कलाकार आणि क्रूला माहिती देण्यात आली. एखाद्या विभागाला एखादा सीन कसा शूट करायचा हे माहिती असे, मात्र तो सीन कथेत नेमका का आहे, याची पूर्ण माहिती नसायची.

शेवट जाणून घेण्यासाठी मित्रांकडूनही दबाव

विशेष म्हणजे चित्रपटाचा क्लायमॅक्स जाणून घेण्यासाठी अनेक कलाकार, क्रू मेंबर्स, मित्र आणि नातेवाईकांनी आमिल यांच्याकडे विचारणा केली. काहींनी तर शेवट सांगण्यासाठी त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचाही त्यांनी खुलासा केला. मात्र त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांशी केलेली निष्ठा कायम ठेवत क्लायमॅक्सचा सस्पेन्स रिलीजपर्यंत जपला.

अशा प्रकारे 100 हून अधिक ड्राफ्ट, अत्यंत गुप्त ठेवलेला क्लायमॅक्स आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांचं मोठं दडपण या सगळ्यातून ‘दृश्यम 3’ची कथा आकाराला आली. त्यामुळे चित्रपटाच्या पडद्यावर दिसणाऱ्या प्रत्येक ट्विस्टमागे किती मोठी लेखनप्रक्रिया होती, याची कल्पना या खुलाशातून येते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us