‘या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांनाही रणवीरच्या ‘धुरंधर 2’ची भुरळ; दहशतवादाबद्दल म्हणाले..

भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी त्यांनी मुलाच्या आग्रहाखातर रणवीर सिंहचा 'धुरंधर' हा चित्रपट पाहिला. त्यानंतर आता दुसऱ्या भागाचीही उत्सुकतेने प्रतीक्षा करत असल्याचं ते म्हणाले. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाच्या सीक्वेलचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता.

या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनाही रणवीरच्या धुरंधर 2ची भुरळ; दहशतवादाबद्दल म्हणाले..
Dhurandhar 2
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 08, 2026 | 5:30 PM

जेव्हा एखादे राष्ट्रप्रमुख दुसऱ्या देशाला भेट देतात, तेव्हा अशा दौऱ्यांदरम्यान सहसा केवळ संरक्षण करार, तंत्रज्ञान आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीच्या चर्चा होतात. परंतु फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब हे चक्क अभिनेता रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाबद्दल व्यक्त झाले. भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी आपल्या मुलाच्या आग्रहाखातर मी रणवीरचा ‘धुरंधर’ हा चित्रपट पाहिल्याची कबुली स्टब यांनी दिली. इतकंच नव्हे तर या चित्रपटाच्या सीक्वेलबद्दलही प्रचंड उत्सुक असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय थ्रिलरने सातासमुद्रापार आपली लोकप्रियता निर्माण केली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब हे 4 ते 7 मार्चपर्यंत भारत दौऱ्यावर होते. यादरम्यान ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “हे खरंच खूप रंजक आहे की भारतात येण्यापूर्वी मला माझ्या मुलाने ‘धुरंधर’ चित्रपट पाहण्यास सांगितलं होतं. मी तो चित्रपट पागिला आणि मला दहशतावादाविरुद्धच्या लढाईची ही कहाणी खूपच आवडली. आता मी 19 मार्च रोजी येणाऱ्या याच्या सीक्वेलची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करतोय.”

7 मार्च रोजीच ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या ट्रेलरमध्ये जसकीरत सिंह रंगीच्या भूमिकेतील रणवीर सिंहने जबरदस्त अॅक्शन सीन्स केल्याचं पहायला मिळालं. या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की जसकीरतने कराचीच्या अंडरवर्ल्ड विश्वास आपला जम बसवला आहे आणि ल्यारीवर ताबा मिळवून तो दहशतवाद्यांचं नेटवर्क उखडून टाकण्याची तयारी करतोय. हा सीक्वेल येत्या 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्येही हा चित्रपट पहायला मिळणार आहे.

‘धुरंधर’च्या पहिल्या भागात रणवीर सिंहने हमजा या गुप्तहेराची भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्याही भूमिका आहेत. अक्षय खन्नाने साकारलेल्या रेहमान डकैतच्या भूमिकेची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ पहायला मिळाली होती. या चित्रपटाने जगभरात कमाईचा हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला होता. आता धुरंधरचा सीक्वेल कमाईचे कोणते नवे विक्रम रचणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us