लाज वाटली पाहिजे तुम्हाला..; नसीरुद्दीन शाह यांच्या ‘BJP झूठी पार्टी’ वक्तव्यावर गजेंद्र चौहान संतापले
कोलकात्यातील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असून त्यावरून ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी भाजपवर तिखट शब्दांत टीका केली होती. त्यावर आता अभिनेते गजेंद्र चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) केलेल्या टीकेमुळे मनोरंजन क्षेत्रात नवा वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालमधील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील (SRFTI) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना शाह यांनी भाजपला ‘खोटारडा पक्ष’ म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर अभिनेते आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (FTII) माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत युधिष्ठिराची भूमिका साकारलेल्या चौहान यांनी शाह यांनी राजकीय विषयांवर अधिक सकारात्मक आणि विधायक भूमिका घ्यावी, असं म्हटलं आहे.
नसीरुद्दीन शाह यांनी भाजपवर काय आरोप केले?
नसीरुद्दीन शाह यांनी 24 ऑक्टोबर रोजी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये SRFTI मधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील विजयाचा संदर्भ देत, आपल्या विचारसरणीशी आणि धोरणांशी सहमत नसलेल्या लोकांविरोधात सूडाची भावना ठेवून कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या परिस्थितीचा फटका आता चित्रपटसृष्टीत करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत असल्याचंही शाह यांनी म्हटलं.
विद्यार्थी संस्थेच्या प्रशासनाकडे उत्तरदायित्वाची मागणी करत असताना त्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या, त्यांच्यावर पाळत ठेवली गेली, धमकावण्यात आलं आणि वसतिगृहं रिकामी करण्यास सांगण्यात आलं, असा दावा शाह यांनी केला. सत्ताधारी पक्ष स्वतःच्या बाजूने प्रचार करण्याबरोबरच विद्यार्थ्यांवर प्रभाव टाकण्याचा किंवा त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना नागरिकांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.
गजेंद्र चौहान यांनी नसीरुद्दीन शाह यांना सुनावलं
नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गजेंद्र चौहान यांनी नाराजी व्यक्त केली. शाह हे उत्तम कलाकार असून त्यांच्याबद्दल आदर असला, तरी त्यांनी राजकीय विषयांवर बोलताना दोन्ही बाजू समजून घ्यायला हव्यात, असं चौहान यांनी म्हटलं. ही अत्यंत दु:खद बाब आहे. ज्या पक्षाने गेल्या 12-13 वर्षांपासून देशावर राज्य केलं आहे, त्या पक्षाला तुम्ही ‘ब्लडी झूठी पार्टी’ असं म्हटलं. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. देशातील 140 कोटी लोकांनी त्या पक्षाला सत्तेच्या सर्वोच्च स्थानी बसवलं आहे आणि तुम्ही त्याच पक्षासाठी अपशब्द वापरत आहात, अशा शब्दांत गजेंद्र चौहान यांनी तीव्र नाराजी बोलून दाखवली. ‘तुम्ही एक महान कलाकार आहात, चांगले माणूस आहात; पण तुमच्या ट्विट्स आणि व्हिडीओंमध्ये नेहमी एकाच बाजूची भूमिका दिसते. तुम्ही दोन्ही बाजूंचा विचार करत नाही,’ अशा शब्दांत चौहान यांनी शाह यांच्यावर टीका केली. सरकारवर टीका करण्याऐवजी संबंधित विद्यार्थ्यांना विधायक सल्ला द्यावा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असंही त्यांनी म्हटलं.
यानंतर गजेंद्र चौहान यांनी SRFTI मधील अलीकडील विद्यार्थी आंदोलनावरही भाष्य केलं. संस्थेचं प्रशासन विद्यार्थ्यांच्या समस्या आणि चिंता दूर करण्यास सक्षम असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचं मान्य करतानाच, संबंधित पक्षांमध्ये चर्चा होईपर्यंत बेमुदत आंदोलन केल्याने समस्येचं निराकरण होणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
नसीरुद्दीन शाह यांचा व्हिडीओ-
‘जर SRFTI मध्ये संप होत असेल, तर तिथलं प्रशासन त्यावर योग्य ती कार्यवाही करेल. तिथे सक्षम लोक आहेत. आंदोलन करणं हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे; मात्र, जोपर्यंत तुम्ही सर्वजण एकत्र बसून चर्चा करत नाही, तोपर्यंत आंदोलनातून कोणताही निष्कर्ष निघणार नाही. सरकारवर टीका करण्याऐवजी, इतकी मेहनत करून काम करणाऱ्या सरकारच्या प्रयत्नांची दखल घेण्याबरोबरच तुम्ही विद्यार्थ्यांना योग्य सल्ला द्यायला हवा. आमचे कार्यकर्ते आणि राजकारण्यांनी खूप मेहनत घेतली आहे, निवडणुका जिंकल्या आहेत आणि जनतेसाठी काहीही काम न करणाऱ्या लोकांना सत्तेतून दूर केलं आहे. आता पुढे काय करायचं, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही एक महान कलाकार आहात. फक्त थोडा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा’, असा सल्ला त्यांनी नसीरुद्दीन शाह यांना दिला आहे.
SRFTI मधील विद्यार्थ्यांचं आंदोलन नेमकं कशासाठी?
कोलकात्यातील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. संस्थेचे कुलगुरू संतोष अजमेरा यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थी 12 ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन करत असल्याचं वृत्त आहे. कॅम्पसमध्ये झालेल्या कथित हिंसक घटनांनंतर विद्यार्थ्यांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. प्रशासनाने या घटनांबाबत उत्तरदायित्व स्वीकारावं आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर कार्यवाही करावी, अशी त्यांची भूमिका आहे.