लग्नात आणि पार्टीमध्ये 100-150 रुपयांसाठी गाणारा गुरु रंधावा आज कोट्यवधींचा मालक, संपत्ती किती?

कधी काळी लग्नसमारंभात 100-150 रुपयांमध्ये गाणी गाणारा हा गायक आज आहे कोट्यवधींचा मालक. एका गाण्याने मिळवून दिली प्रचंड लोकप्रियता. किती आहे संपत्ती?

लग्नात आणि पार्टीमध्ये 100-150 रुपयांसाठी गाणारा गुरु रंधावा आज कोट्यवधींचा मालक, संपत्ती किती?
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 30, 2026 | 8:00 PM

पंजाबी संगीतविश्वातील लोकप्रिय नाव असलेला गायक गुरु रंधावा याने आपल्या दमदार आवाजाने आणि सुपरहिट गाण्यांनी प्रेक्षकांच्याही मनात खास स्थान निर्माण केलं आहे. पंजाबी संगीतासोबतच त्याने बॉलिवूडमध्येही आपल्या आवाजाची जादू दाखवली असून आज तो देशभरातील लाखो चाहत्यांचा आवडता गायक आहे. 30 ऑगस्ट रोजी गुरु रंधावा आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया.

गुरु रंधावाचा जन्म पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यात झाला. त्याचं खरं नाव गुरशरणजोत सिंह रंधावा आहे. संगीत क्षेत्रात आल्यानंतर त्याने ‘गुरु’ हे स्टेज नेम स्वीकारलं. हे नाव प्रसिद्ध रॅपर बोहेमिया यांनी दिल्याचं सांगितलं जातं. लहानपणापासूनच गुरु रंधावाला संगीताची विशेष आवड होती. शालेय जीवनातही तो विविध संगीत स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचा. संगीत क्षेत्रात मोठं नाव कमावण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्याने संघर्षाला सुरुवात केली.

Loading...

लग्न आणि पार्ट्यांमध्ये गायचा, मिळायचे फक्त 100-150 रुपये

आज एका गाण्यासाठी लाखो रुपये मानधन घेणाऱ्या गुरु रंधावाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मात्र अतिशय साध्या पद्धतीने केली होती. व्यावसायिक गायक म्हणून ओळख निर्माण होण्यापूर्वी तो लग्नसमारंभ आणि पार्ट्यांमध्ये गाणी गायचा. त्या काळात त्याला एका कार्यक्रमासाठी केवळ 100 ते 150 रुपये मिळायचे.

2012 मध्ये त्याने ‘सेम गर्ल’ हे पहिलं गाणं रिलीज केलं. मात्र या गाण्याला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ‘चढ गई’ हे गाणंही फारसं चाललं नाही. त्याचा ‘पेग वन’ हा अल्बमदेखील प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप पाडू शकला नाही.

‘पटोला’ ठरलं आयुष्य बदलणारं गाणं

सततच्या अपयशानंतरही गुरु रंधावाने हार मानली नाही. 2015 मध्ये त्याला मोठी ओळख मिळवून देणारं ‘पटोला’ हे गाणं रिलीज झालं. या गाण्यासाठी त्याने रॅपर बोहेमियासोबत काम केलं. ‘पटोला’च्या यशानंतर गुरु रंधावाच्या करिअरला मोठी झेप मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही.

एका कॉन्सर्टसाठी लाखोंचं मानधन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरु रंधावा एका लाइव्ह कॉन्सर्टसाठी सुमारे 5 ते 10 लाख रुपये मानधन घेतो. तर एका गाण्यासाठी त्याचं मानधन 15 ते 25 लाख रुपयांपर्यंत असल्याचं सांगितलं जातं.

GQ इंडियाच्या रिपोर्टनुसार, गुरु रंधावाची एकूण संपत्ती सुमारे 41 कोटी रुपये असल्याचा दावा केला जातो. त्याच्याकडे महागड्या आणि आलिशान कारचं कलेक्शनही आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us