14 व्या वर्षी हेमा मालिनी यांना दिग्दर्शकाने चित्रपटातून बाहेर काढलेले, काय होतं कारण?

‘तू कधीच अभिनेत्री होऊ शकणार नाहीस!’ हेमा मालिनी यांना दिग्दर्शकाने दाखवला होता चित्रपटातून बाहेरचा रस्ता. नेमकं काय घडलेलं? वाचा सविस्तर

14 व्या वर्षी हेमा मालिनी यांना दिग्दर्शकाने चित्रपटातून बाहेर काढलेले, काय होतं कारण?
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 15, 2026 | 6:21 PM

आपल्या सौंदर्याने, नृत्यकौशल्याने आणि दमदार अभिनयाने अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांना आज बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखलं जातं. मात्र, चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यापूर्वी त्यांनाही नकाराचा सामना करावा लागला होता. करिअरच्या सुरुवातीलाच एका दिग्दर्शकाने त्यांना चित्रपटातून काढून टाकलं होतं. इतकंच नाही, तर त्या अभिनेत्री होण्यासाठी योग्य नसल्याचंही त्यांना सुनावण्यात आलं होतं.

हेमा मालिनी यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 रोजी तमिळनाडूमध्ये झाला. त्यांची आई जया चक्रवर्ती या चित्रपट निर्मितीशी संबंधित होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच हेमा यांना कला आणि चित्रपटांचं वातावरण मिळालं. त्यांच्या आईची इच्छा होती की, त्यांनी उत्तम शास्त्रीय नृत्यांगना व्हावं. हेमा यांनीही अगदी लहान वयात नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली.

Loading...

वयाच्या अवघ्या 13-14 व्या वर्षी त्यांना ‘वेन्निरा अदाई’ या तमिळ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन सी. व्ही. श्रीधर करत होते. सुरुवातीला हेमा यांची निवड करण्यात आली आणि त्यांचे काही शॉट्सही चित्रित करण्यात आले. त्यामुळे आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाल्याचा आनंद त्यांना झाला होता.

दिग्दर्शकाने केलं होतं रिजेक्ट

मात्र, काही दिवसांच्या शूटिंगनंतर दिग्दर्शकाने हेमा मालिनी यांना चित्रपटातून काढून टाकलं. हेमा यांनी आपल्या ‘बियॉन्ड द ड्रीमगर्ल’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी या घटनेचा उल्लेख केला होता. दिग्दर्शकाने त्या खूपच बारीक असल्याचं सांगत अभिनेत्री होण्यासाठी योग्य नसल्याचं म्हटलं होतं.

इतक्या कमी वयात मिळालेल्या या नकारामुळे हेमा मालिनी यांना मोठा धक्का बसला. चित्रपटातून अचानक बाहेर काढल्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही डळमळीत झाला होता. लोक आपली चेष्टा करतील आणि आपल्या नृत्याच्या कार्यक्रमांनाही येणं बंद करतील, अशी भीती त्यांना वाटत होती.

नकारानंतरही सोडली नाही जिद्द

चित्रपटातील अपयशामुळे निराशा आली, तरी हेमा मालिनी यांनी हार मानली नाही. त्यांनी नृत्य आणि अभिनय सुरू ठेवत आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला. अखेर 1968 मध्ये राज कपूर यांच्यासोबत ‘सपनों का सौदागर’ या चित्रपटातून त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वाची संधी मिळाली. या चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान त्यांना ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळख मिळू लागली. त्यानंतर 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉनी मेरा नाम’ या चित्रपटाने त्यांच्या लोकप्रियतेत मोठी भर घातली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us